राज्य प्रादेशिक परिवहन विभागातर्फे नागरिकांची आरटीओ कार्यालयातील फिरफिर थांबवण्यासाठी आरटीओ विभागातर्फे वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र डाक विभागातर्फे घरपोच देण्यात येत आहे. यासाठी राज्य शासन व डाक विभाग यांच्यात करार करण्यात आला आहे. या करारानुसार आरटीओ विभागातर्फे यासाठी डाक विभागाला एका टपालाचे ४५ रुपये देण्यात येतात. महिन्याला जितके टपाल आरटीओ कार्यालयाकडून डाक विभागाला पाठविण्यात येईल, त्याप्रमाणे आरटीओकडून डाक विभागाला पैसे देण्यात येत असतात. दरमहा आरटीओकडून डाक विभागाला आठ ते दहा लाखांचा धनादेश पाठविण्यात येत आहे. दरम्यान, पोस्टाचे कर्मचारी दररोज आरटीओ कार्यालयात जाऊन, वाहन परवाने व आरसी बुक आणून, त्याची पोस्टात नोंदणी करीत असतात. त्यानंतर एका पाकिटात हे वाहन परवाने व आरसी बुक टाकून त्यावर संबंधित व्यक्तीचा पत्ता टाकून ते त्या-त्या भागातील पोस्ट कर्मचाऱ्यांमार्फत वाटप करण्यात येत आहे.
आरटीओ कार्यालयातून हे टपाल आणल्यावर दुसऱ्या दिवसापासूनच वाटपाची प्रक्रिया सुरू होत असल्याचे डाक विभागातर्फे सांगण्यात आले. तसेच ज्या व्यक्तीचे टपाल परत येते, ते टपाल पुन्हा आरटीओ कार्यालयाकडे सोपविण्यात येत असल्याचे डाक विभागातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
रेल्वेच्या डाक विभागामार्फत बाहेरच्या जिल्ह्यातील टपाल रवाना
आरटीओ कार्यालयाकडून डाक विभागाकडे जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातीलही एखाद्या व्यक्तीचे वाहन परवाना व आरसी बुक पाठविण्यात येत असते. हे टपालही डाक विभागातर्फेच वाटप करण्यात येत असते. मात्र, बाहेरगावी हे टपाल रेल्वेच्या डाक विभागातर्फे (आरएमएस) पाठविण्यात येते. आरटीओ कार्यालयाकडून दररोज कधी ३००, तर कधी ४०० टपाल येत असून, त्यातील मोजके टपाल हे बाहेरच्या जिल्ह्यातील असते तर हे टपालही रेल्वेच्या डाक विभागामार्फत त्या त्या जिल्ह्यात रवाना करून पोस्टातर्फे वाटप करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.