लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नशिराबाद येथे नगरपरिषद स्थापण्याबाबत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी अधिसूचना निघाल्यास आगामी जिल्हा परिषदेच्या राजकाणात समीकरणे बदलणार आहेत. प्रशासकीय हालचाली सुरू झाल्यानंतर राजकीय पदाधिकारीही याबाबत प्राथमिक स्तरावर मोर्चेबांधणी करीत आहेत. मात्र, त्यातच आता मुदतवाढीच्या चर्चां सुरू झाल्या आहेत.
जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार गट व गणनिहाय माहिती सादर करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी नुकतेच दिले आहे. त्यामुळे निवडणुकांच्या प्रशासकीय तयारीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता इच्छुकही जागे झाले असून त्यांचीही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यंदा गटांमध्ये बदल होण्याची शक्यता बघता कोणी कोठून लढावे, कोणाला कोणता गट सोयीचा राहील याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू झाल्या आहेत.
नगरपरिषदेच्या हालचाली
नशिराबाद येथे नगरपरिषद स्थापन होण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून यांच्या हरकतींवर सुनावणी झाली आहे. जिल्हा परिषदेची मार्च २०२१ मध्ये मुदत संपत असून त्या आधी ही अधिसूचना निघाल्यास पुढील समीकरणे महत्त्वाची ठरणार आहे. त्यात नशिराबाद-भादली हा जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांचा गट आहे. तो कमी होऊ शकतो, मात्र, आगामी काळात पक्षाच्या सूचनेनुसारच निर्णय घेऊ, अशी भूमिका उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी मांडली आहे.
मुदतवाढीची चर्चा
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले असून आता मुदतवाढीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यात कोराेनाच्या तिसऱ्या लाटेत नेमकी कशी स्थिती राहणार, यावरही बरेचसे चित्र अवलंबून राहणार आहे.