गटारी तुंबल्याने आरोग्य धोक्यात
जळगाव : शहरातील तहसील कार्यालय परिसरात अनियमित साफसफाई अभावी अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.
तहसील परिसरात पुन्हा थाटले अतिक्रमण
जळगाव : गेल्या वर्षी तात्कालीन मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी तहसील कार्यालय परिसरातील सर्व प्रकारचे अतिक्रमण हटवून, हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला होता. या कारवाई नागरिकांकडुनही स्वागत करण्यात येत होते. मात्र, डांगे यांची बदली होताच, या ठिकाणी पुन्हा दुकाने थाटून अतिक्रमण झाले आहे. तरी मनपा आयुक्तांनी पुन्हा या ठिकाणी कारवाई मोहिम राबविण्याची मागणी होत आहे.
रेल्वेने मासिक पास सुरू करण्याची मागणी
जळगाव : सध्या कोरोना काळात ज्या रेल्वे गाड्या सुरू आहेत, त्या गाड्यांना चाकरमान्यासांठी मासिक पासची सुविधा नसल्यामुळे खाजगी बसने प्रवास करावा लागत आहे. या चाकरमान्यांसह स्थानिक प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या गाड्यांना मासिक पास सुरू करण्याची मागणी चाकरमानी प्रवाशांमधुन केली जात आहे.
रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी
जळगाव : शहरातील पिंप्राळा रेल्वेगेट कडून नवसाच्या गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे व दगड-गोटे वर आल्यामुळे वाहनधारकांचे चांगलेच हाल होत आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून चालणेही अवघड असते. त्यामुळे मनपा प्रशासनाने यंदा पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.