बोदवड : दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुळे पत्नीचाही मृत्यू
बोदवड, जि. जळगाव : दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुळे झालेला पत्नीचा मृत्यू तसेच डोक्यावर पाच लाखांचा कर्जाचा डोंगर यामुळे खचलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पळासखेड, ता. बोदवड येथे सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
संजय माणिक चव्हाण (५०, रा. पळासखेड, ता. बोदवड) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मे २०२१मध्ये त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाली. तिच्या उपचारासाठी पतसंस्थेतून कर्ज काढले होते. तसेच शेतीसाठीही आधीच कर्ज काढले होते. त्यांच्यावर पाच लाखांचे कर्ज होते. एवढा पैसा खर्च करूनही पत्नीचा जीव वाचला नाही. वरून पाच लाखांच्या कर्जाचा डोंगर यामुळे ते पुरते खचले आणि या विवंचनेतच त्यांनी जीवनयात्रा संपविली, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
सकाळी या घटनेची माहिती मिळताच बाजार समितीचे संचालक रामदास पाटील यांनी त्यांना दवाखान्यात हलविले. परंतु रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे.