दापोरा, ता.जळगाव : जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कापूस पीक सर्वांचे महत्त्वाचे आहे. दमदार पावसामुळे अधिक जोमाने पीक येईल, अशी आशा असताना आता मात्र जेमतेम परिस्थिती येऊन उभी असल्याने बळीराजाचे डोळ्यासमोर पिके सडत असल्याची स्थिती आहे. मागील दोन वर्षापासून सतत कोणत्याना कोणत्या संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यात दुष्काळ, ओला दुष्काळ, कोरोनामुळे मागील वर्षी शेतीमालास मिळालेला कवडीमोल भाव आणि शेतीसाठी लागत असलेली बी-बियाणे, कीटकनाशके, खतांचे वाढलेले भाव यामुळे सर्वच स्तरातून शेतकरी संकटांशी सामना करीत आहेत.
तक्रारीची अट शिथिल करण्याची मागणी
जिल्हाभरात अनेक शेतकऱ्यांनी मका, कपाशी, उडीद, मूग यासह इतर पिकांचा खरीप विमा उतरविलेला होता. जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी पिके पाण्याखाली जाऊन सडत असल्याची परिस्थिती असताना पावसाचे प्रमाणदेखील अनेक तालुक्यात शंभर टक्केच्या वर झाले असताना मात्र विमा कंपनीच्या निकषानुसार आपल्या क्षेत्राची तक्रार करण्याची मागणी होते. अनेकवेळा शेतकऱ्याकडे मोबाइल नसतो, इंटरनेट सुविधा नसते. तक्रार कशी करावी याचीदेखील माहिती नसते. अशावेळी तक्रार कशी करावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाची सर्व टक्केवारी शासनाकडे असूनही पुन्हा तक्रारीचा आग्रह चुकीचा असून, ती अट शिथिल करून सरसकट विमा मंजूर करावा, अशी मागणी होत आहे.
सर्वच पिके गेल्याची परिस्थिती
दापोरा परिसरात सर्वच पिके गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरात केळी हे मुख्य पीक असून, करप्याच्या प्रादुर्भावामुळे काढणीयोग्य असलेली केळी झाडावरच पिकत असून, त्यासोबत सोयाबीन, ज्वारी, मका, कपाशी सर्वच पिके अतिपावसाने खराब होत आहे.
फोटो : दापोरा परिसरात अतिपावसामुळे एका शेतकऱ्याच्या शेतात अशी कपाशी पिकाची परिस्थिती झाली असून, खर्चही निघणे मुश्कील आहे.