अमळनेर : तालुक्यातील डांगर येथील यात्रेतून मंदिरासमोरून मोटारसायकल चोरणाऱ्या डांगरच्या दोघांना धुळे येथे मोटारसायकल विकताना पकडण्यात आले आहे.
डांगर येथील देवीच्या यात्रेत दि. २३ रोजी पिंपळकोठा येथील संजय आत्माराम पाटील हे मध्यरात्री १ वाजता मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यांनी त्यांची मोटरसायकल (एमएच १९ डीसी ८३६१) ही मंदिराबाहेर लावली होती. ते दर्शन घेऊन परतल्यानंतर त्यांची २५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, ही मोटरसायकल धुळे येथे विक्री करताना डांगर येथील नानू केशव मालचे व समीर गुलाब खाटीक एलसीबी पोलिसांना आढळून आले. यांनी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे याना कळविल्यावर हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे , हेडकॉन्स्टेबल जे डी पाटील व भूषण पाटील यांनी धुळे येथे जाऊन आरोपी ताब्यात घेतले आहेत. २४ तासाच्या आत आरोपी निष्पन्न झाल्याने मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपीना पारोळा न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.