लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात ३० ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीत चाळीसगाव तालुक्यात २५३.०७ हेक्टर जमीन खरडली गेली आहे; तर भडगाव आणि पाचोरा या दोन तालुक्यांत प्रत्येकी पाच हेक्टर जमीन खरडली गेल्याने त्यावरील सुपीक माती वाहून गेली आहे. ५१६ शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले आहे.
यात सर्वाधिक नुकसान हे चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड या गावात झाले आहे. तेथे ८० शेतकऱ्यांची ६० हेक्टर शेतजमीन खरडली गेली आहे. त्यासोबतच आंबेहोळ ३२ हेक्टर, बाणगाव ३१.७६, शिवापूर ९.२२, पिंपरखेड ६०, लोंजे ३२, रोकडे १५.१९, जामडी ०.४०, पाथर्जे १.६०, कोंगा नगर २.९९, वाघले ०.५०, हातले ०.०५, जावळे ०.२९, रांजणगाव ४.३०, खेरडे १.४०, चाळीसगाव ५, गणपूर ३, वाकडी २.८५, वाघडू २०.२०, बोढरे ३०.३२ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. त्यात ५१६ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. त्यांना शासनाच्या नियमानुसार प्रति हेक्टरी ३७,५०० रुपये मदत दिली जाणार आहे.
पीक विमा नुकसानीचे ३०३ पंचनामे
जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी ३१९९ प्रकरणे दाखल केली आहेत. त्यातून ७९१ प्रकरणांमध्ये सर्वेक्षण अपूर्ण आहे; तर ३०३ शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.