लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र शासनाने सर्वांसाठी जलतरण सुरू करण्याची तयारी केली आहे. अशा परिस्थितीत मात्र जळगाव शहरातील जलतरणाची स्थिती अजूनही फारशी सुधारलेली नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सध्या बंद आहे. ठेकेदार आणि क्रीडा कार्यालयात कराराच्या वादामुळे हा जलतरण तलाव बंद ठेवण्यात आला आहे. इतर पोलीस जलतरण तलाव, एकलव्य क्रीडा संकुल आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावात एकूण ९० खेळाडू जलतरणासाठी नियमितपणे येत आहेत.
राज्यात सध्या फक्त राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खेळाडूंना जलतरणाचा सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही परवानगीदेखील विविध नियमांच्या अधीन राहून देण्यात आली आहे.
कोरोनाच्या आधी हजारोंच्या संख्येने जळगावकर जलतरणासाठी जात होते. अनेक जण केवळ फिटनेससाठीही जलतरण करत होते. खेळाडू हे वर्षभर जलतरणाचा सराव करतात, तर हौशी आणि केवळ तंदुरुस्तीसाठी जलतरणाला येणारे हे जानेवारीनंतर जुलैपर्यंत जलतरणासाठी येत असतात. आता जलतरण तलावांवर गर्दी वाढण्याचेच दिवस आहेत. मात्र, अद्यापही राज्य शासनाने आणि केंद्र शासनाच्या क्रीडा आणि इतर विभागांनी त्याबाबतची नियमावली जाहीर केलेली नाही. त्यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षक देखील संभ्रमात आहेत.
जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी
सध्या जळगाव शहरात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात बांधलेला जलतरण तलाव हा सर्वांत मोठा तलाव आहे. त्या ठिकाणी खेळाडूंसाठी सुविधादेखील उपलब्ध आहेत. मात्र, शहरापासून लांब असल्याने या तलावाकडे जाण्यास खेळाडू तयार होत नाहीत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावाला खेळाडूंची पसंती आहे. मात्र, तेथे देखील ठेकेदार आणि क्रीडा कार्यालय यांच्यात करारातील अटींचे पालन करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हा तलाव बंद आहे. मनपाचा कोकीळ गुरुजी तलाव सध्या बंद असला तरी लवकरच सुरू होणार आहे.
आकडेवारी
जलतरण तलाव - ६ - जिल्हा क्रीडा संकुल, पोलीस जलतरण तलाव, विद्यापीठ क्रीडा संकुलातील तलाव, मनपाचा कोकीळ गुरुजी जलतरण तलाव, एकलव्य क्रीडा संकुल, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा तलाव.
सरावाला येणारे खेळाडू - ९०