लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : पितृपक्षाला सुरुवात झाली आहे आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून कावळ्यांना घास घालण्याची प्रथा आहे. मात्र, निसर्गातील बदलामुळे कावळे दुर्मीळ झाले आहेत. अशा स्थितीत वर्णेश्वर मंदिराचे विश्वस्त व माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी पितृपक्षात कावळे मिळतील, असे आवाहन सोशल मीडियावर केले आहे.
पितृपक्ष सुरू झाला आहे. आता प्रत्येक घरामध्ये आपल्या पितरांना गोडधोड खाऊ घालण्याची परंपरा आहे. कावळ्यांना घास घातला म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि घरात कोणतेही संकट येत नाही, पूर्वजांची अवकृपा होत नाही. मात्र, त्यासाठी कावळे आवश्यक आहेत. सध्या शहरीकरण, यांत्रिकीकरण आणि रासायनिक जग यामुळे दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या दुर्मीळ होत चालली आहे. त्यात कावळे तर दिसेनासे झाले आहेत; परंतु वर्णेश्वर महादेव मंदिर परिसर व अंबऋषी टेकडी परिसरात पक्षीमित्र सुनील भोई, संजय शुक्ला, लोटन पाटील, महेश कोठावदे, संतोष पाटील यांनी अनेक कावळे व पक्षी पाळून ठेवलेले आहेत. नागरिकांनी चिंता करू नये, आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी आता वर्णेश्वर मंदिर व अंबर्शी टेकडी परिसरात काक घास आणावा, असे आवाहन मंदिराचे सुभाष चौधरी यांनी केले आहे. पर्यावरण संवर्धन साधणाऱ्या या आगळ्यावेगळ्या जनसेवेची चर्चा होत आहे.