लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढत असून, चेतनदास मेहता या केंद्रावर कोव्हॅक्सिनचे डोस घेण्यासाठी नागरिकांनी धाव घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान, शुक्रवारी काही काळ सर्वत्रच सर्व्हर डाऊन झाल्याने लसीकरण थांबलेले होते. दीड तासानंतर ते पूर्ववत झाले.
शहरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोसही उपलब्ध होता. हळूहळू लसीकरण पूर्वपदावर येत असून, गुरुवारी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याला डोस प्राप्त झाले होते. त्यातून एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक लसीकरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधी जिल्हाभरात एकाच दिवसात ३६ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती. रोज ४० हजार लस उपलब्ध झाल्यास पुढील दोन ते तीन महिन्यांत लसीकरणाचे टार्गेट पूर्ण होऊ शकते, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे. जिल्हाभरात जळगाव शहरातील लसीकरणाचा वेग चांगला असून, तालुक्यातच सर्वाधिक लसीकरण झाले आहे. दरम्यान, शनिवारी रोटरी भवन येथील केंद्रावर कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस सर्व वयोगटांसाठी उपलब्ध राहणार आहे. यासह रेडक्रॉसच्या केंद्रावर कोविशल्ड लस दुसऱ्या डोससाठी उपलब्ध राहणार आहे.