अमळनेर : काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अतिवृष्टी झालेल्या मठगव्हाण, नालखेडे, गंगापुरी, खापरखेडा, जळोद शिवारातील पिकांची पाहणी केली.
मठगव्हाण, पातोंडा, जळोद, गंगापुरी शिवारातील पाटचाऱ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात यावे, यातून पावसाच्या पाण्यामुळे पिकांचे होणारे नुकसान टळण्यास मदत होणार आहे, अशी व्यथा परिसरातील शेतकऱ्यांनी मांडली आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला तलाव भरल्यासारखे, शेते पाण्याने भरल्याने, कपाशीच्या बोंडातील कापसातून अंकुर फुटले आहेत. कपाशीच्या झाडांची पाने सडकी होऊन खाली गळून पडलेली आहेत. तसेच लाल्या रोग पडल्यासारखे, कपाशीची सर्व पाने लाल झालेली आहेत. अशी परिस्थिती सात-आठ वर्षापासून या सर्व गावात आहे. रात्रंदिवस कष्ट करून उगवलेले पीक, पाण्याचा निचरा होत नसल्याने हातचे जात आहे. या समस्येवर ड्रोनद्वारे पाहणी करून, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष कृषिभूषण सुरेश पाटील, किसान सेल जिल्हा सचिव भागवत केशव सूर्यवंशी, किसान सेल अमळनेर तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील आदी उपस्थित होते.