व्हायरलचेही रुग्ण वाढले : पालकांनी भीती न बाळगता काळजी घ्यावी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरासह जिल्हाभरात सध्या व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढत असून यात लहान मुलांनाही सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे जाणवत आहेत. अशा स्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा आजार अंगावर न काढता त्यांची तपासणी तातडीने करावी व योग्य औषधोपचार घ्यावे, पालकांनी भीती न बाळगता काळजी घ्यावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमी ताप आलेल्या प्रत्येक लहान मुलांची कोरोना चाचणी करावी, अशा सूचना जिल्ह्यांना दिल्या आहेत. दरम्यान, दुसऱ्या लाटेत स्थानिक प्रशासनाकडून तशा सूचना खासगी डॉक्टरांना देण्यात आल्या होत्या. आता तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असण्याची शक्यता असल्याने बालकांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोरोनाचे एकूण रुग्ण : १,४२,५८६
१५ वर्षाखालील रुग्ण -११,०३०
ताप आला म्हणजे कोरोना असे नाही, पण...
प्रत्येक ताप हा कोरोनाच असेल असे नाही, सध्याचे व्हायरल इन्फेक्शन व कोरोना याची लक्षणे जवळपास सारखीच असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये, मात्र, मुलांना लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती तपासणी करून घेणे कधीही चांगले. असेही तज्ज्ञ सांगतात.
सर्दी, खोकला, तापाची साथ
सध्या सर्दी, खोकला व तापाची साथ सुरू असल्याचे चित्र आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे तर परिसरातील रुग्णालयांमध्ये लहान मुलांची गर्दी वाढली आहे. सद्यस्थितीत शहरात कोरोनाचा संसर्ग अगदी कमी आहे. मात्र, तो पूर्णत: कमी झालेला नाही. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
कोट
सध्या सर्दी, ताप याची साथ सुरू आहे. कोरोनाची साथ त्यामानाने शहरात नाही. विषाणूजन्य आजारांची लक्षणे जरी सारखी असली तरी अशा स्थितीत पालकांनी घाबरून जाऊ नये, मात्र, डॉक्टरांकडून मुलांची तपासणी करून घ्यावी. या दिवसांमध्ये पाणी नियमित उकळून थंड करून प्यावे, बाहेरचे खाणे टाळावे, गर्दीत जाणे टाळावे, धुळीपासून व धुरापासून दूर राहावे. - डॉ. दीपक अटल
बालकांसाठी शंभर बेड
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बालकांसाठी स्वतंत्र शंभर बेडचे नियोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेत रुग्ण वाढल्यास त्या दृष्टीने आणखी बेड या ठिकाणी वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने यापूर्वी जाहीर केले होते. या ठिकाणी बालकांसाठी स्वतंत्र दहा व्हेंटिलेटर आले आहेत. एक अतिदक्षता विभाग स्वतंत्र राहणार आहे. यासह मोहाडी येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात १५ बेड राखीव राहणार आहेत.