जळगाव : जिल्ह्यात दर महिन्याला खून व खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना सातत्याने घडत असून, साडेआठ महिन्यात तब्बल ३८ खून झाले आहेत तर ६९ जणांचा खून करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील आकडेवारी जिल्ह्यातील गुन्हेगारी किती व कशी आहे, हे सांगत आहे. चारित्र्याचा संशय, गँगवार, मालमत्तेचा वाद आणि वर्चस्वाच्या वादातून या घटना घडलेल्या आहेत. गेल्यावर्षी देखील ५८ खून तर खुनाचा प्रयत्न केल्याच्या १२७ घटना घडल्या होत्या. कोरोना काळातही गुन्हेगारी कमी झालेली नाही.
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात चार खून झाले. त्यापैकी मुक्ताईनगर व चोपड्यात प्रत्येकी एक तर जळगाव शहरात सलग दोन दिवसात दोन खून झाले. एका घटनेत तर आईच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने मुलांनीच बापाला मारले तर दुसऱ्या घटनेत पुतण्यावरच संशय घेण्यात आलेला आहे. एरव्ही त्याच्याविरुद्ध तसा गुन्हाच दाखल झाला आहे. या पुतण्याला ताब्यात घेतल्यावरच अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. त्यानेच हा खून केला किंवा नाही याचा ठोस पुरावा अजून तरी पोलिसांकडे नाही किंवा कारणही तसे पुढे आलेले नाही. मुक्ताईनगर तालुक्यातील शेमळदे गावातील खून तर खुन्नसने का पाहतो या कारणावरुन झाला आहे. तर चोपड्यात घरगुती भांडणातून महिलेची हत्या करण्यात आली. खुन्नस आणि इगो या दोन गोष्टी थेट जीवावर उठल्याच्या घटना जिल्ह्यात घडलेल्या आहेत. जून व ऑगस्ट या दोन महिन्यात सर्वाधिक बारा खून झालेले आहेत.
गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ९८ टक्के
खून व खुनाचा प्रयत्न यासारख्या घटनांमध्ये आरोपींना अटक करण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. घरफोडी, दरोडा व चोरी या घटनांच्या तपासात मात्र दिरंगाई झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावखेडा शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात हा खून असल्याचे उघड झाले होते. या घटनेतील खुनी तर सोडाच पण मृत व्यक्ती कोण? हे देखील पोलीस शोधू शकलेले नाहीत.