कार्यक्रमाला हिंदू धर्माचे प्रतिनिधी हभप दिनकर महाराज कडगावकर, भवानी मंदिराचे पुजारी ऋषिकेश महाराज, मुस्लीम धर्माचे प्रतिनिधी म्हणून मुफ्ती सैय्यद अतिक उर रहमान, शीख धर्माचे प्रतिनिधी गुरुप्रीत सिंग, ख्रिश्चन धर्माचे फादर सेन्ट जो, सिंधी धर्माचे प्रतिनिधी महेंद्र अडवाणी, बोहरा समाजाचे प्रतिनिधी अब्दुल कादीर, तसेच बौद्ध समाजाचे भन्ते संघरत्नजी थेरो उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमलानी यांनी प्रास्ताविकात विधिसेवा प्राधिकरणतर्फे तमाम जनतेसाठी उपलब्ध असलेले विविध उपक्रम धर्म मार्तंडांनी सर्व जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत आवाहन केले. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.दिलीप बोरसे यांनी सर्व धर्म मार्तंडांनी लोकांना न्यायालयीन प्रकरणाबाबत लोकअदालतीचा आणि मध्यस्थी यंत्रणेचा लाभ घेण्याबाबत जास्तीतजास्त प्रयत्न करावेत, असे आवाहन केले, तर जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव शेख यांनी शहरासाठी जिल्हा विधिसेवा प्राधिकरण व ग्रामीण भागासाठी तालुका विधिसेवा प्राधिकरणतर्फे मिळणाऱ्या सर्व सेवांचा लाभ समाजातील तळागाळातील लोकापर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्व विषद केले. सूत्रसंचालन न्यायालयीन कर्मचारी बी.जी. नाईक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विधिसेवा प्राधिकरणचे शेख यांच्यासह सर्व कर्मचारी व लायब्ररी शाखेतील कर्मचारी, तसेच संगणक विभागातील अभियंत्यांनी परिश्रम घेतले.