रावेर : मध्यप्रदेशातील हरदा येथील प्रकरण
रावेर : मध्य प्रदेशातील बनावट चलनी नोटांच्या गुन्ह्यात रावेरमधील आणखी चारजणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे रावेरमधील अटकेतील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.
असलम ऊर्फ राजू सुपडू तडवी (वय ३०, रा. पाँच बिवी चौक, रावेर), सोनू मदन हरदे (३०, अफुगल्ली, रावेर), रवींद्र राजाराम प्रजापती (३१, रा. कुंभार वाडा, रावेर), शेख शाकीर शेख साबीर (२६, रा. खाटीक वाडा, रावेर) अशी या अटक करण्यात आलेल्या चारजणांची नावे आहेत.
मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील छिपाबड पोलीस ठाण्यात बनावट चलनी नोटांच्या प्रकरणात १२ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या काही जणांनी दिलेल्या जबाबावरून त्यांनी या नोटा शेख शाकीर शेख हाफिज (१९, रा. पाँच बिवी चौक, रावेर) याच्याकडून घेतल्याचे सांगितल्याने त्याला मध्य प्रदेश पोलिसांनी शनिवारीच ताब्यात घेतले.
मध्य प्रदेश पोलिसांच्या कारवाईनंतर रावेरचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सात-आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता या प्रकरणात चारजण सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून वरील चारही जणांना त्यांच्या घरून सोमवारी पहाटे अटक करण्यात आली.
गावठी कट्टा व तीन काडतुसे जप्त
या बनावट चलनी नोटांच्या रॅकेटमधील एक आरोपी रवींद्र प्रजापती व त्याचा भाऊ महेंद्र अर्जुन प्रजापती (२५, दोघे रा. कुंभारवाडा, रावेर) यांनी लपविलेला २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिली.