जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यालगत व फुले मार्केट परिसरात दुकाने थाटण्यास हॉकर्सला बंदी घातली असतानादेखील या ठिकाणी हॉकर्स आपली दुकाने थाटतच आहेत. शुक्रवारी रस्त्यालगत दुकाने थाटणाऱ्या १७ विक्रेत्यांवर मनपाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत १७ हॉकर्सवर कारवाई करून, त्यांचा माल जप्त करण्यात आला. कारवाई दरम्यान मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी व हॉकर्समध्ये किरकोळ वाददेखील झाला.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे आज आंदोलन
जळगाव : ओबींसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपकडून शनिवारी राज्याच्या महाविकास आघाडीविरोधात सकाळी ११ वाजता आकाशवाणी चौकात चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप महानगरकडून या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून, या आंदोलनात आमदार सुरेश भोळे यांच्यासह भाजपचे जळगाव शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
मृत्यू पावलेल्या गाळेधारकांना श्रद्धांजली
जळगाव : महापालिका प्रशासनाने गाळेधारकांना दिलेल्या अवाजवी बिलांमुळे मानसिक, शारीरिक तणावांमुळे अनेक गाळेधारकांचा मृत्यू झाला असून, या मृत पावलेल्या गाळेधारकांना शुक्रवारी मनपा मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. गेल्या दहा दिवसांपासून गाळेधारकांनी मनपा प्रशासनाविरोधात साखळी उपोषण पुकारले आहे. या ठिकाणी शुक्रवारी गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मृत झालेल्या गाळेधारकांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
हेमू कलाणी उद्यानात वृक्षारोपण
जळगाव : दिग्विजय स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटीतर्फे गुरुवारी शहरातील सेंट लॉरेन्स शाळा, शहिद हेमुकालानी बगीचा रोड परिसरात माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांच्या हस्ते जीवनदायी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी जितेंद्र बागरे, अक्षय ठाकरे, फिरोज तडवी, देवेंद्र अहिरे, आदित्य बागरे, लकी पाटील, संजय तेजकर, प्रथम शेट्ये, हितेंद्र बागरे, हेमंत चौधरी, हार्दिक बागरे, दिग्विजय बागरे, देविदास वाल्हे, अभिषेक पाटील आदी उपस्थित होते.