लोकमत न्यूज नेटवर्क
(व्हॅल्यू ॲडेड)
जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून गेल्या नऊ वर्षांपासून थकीत भाड्याची वसूल करण्याची मोहीम मनपाकडून आठवडाभरापासून सुरू करण्यात आली आहे. आठवडाभरात मनपाकडून तब्बल पाच कोटी रुपयांची वसुली गाळेधारकांकडून करण्यात आली आहे. मनपाने गाळेधारकांकडे थकीत असलेल्या २४० कोटींपैकी १०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
गाळेधारकांप्रकरणी आता मनपा प्रशासनाने काहीअंशी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे गाळेधारक शासनाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून आहेत तर दुसरीकडे मनपा प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वसुली मोहीम व सोबत गाळे सील करण्याची प्रक्रियादेखील सुरू केली आहे. मनपा उपायुक्त प्रशांत पाटील व संतोष वाहुळे या दोन्ही अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, दररोज विविध मार्केटमध्ये जाऊन ही वसुलीची मोहीम सुरू केली आहे.
तीन आयुक्तांनी वसुलीसाठी केले प्रयत्न
मनपाचा मुदत संपलेला मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित आहे. हा विषय अनेकवेळा पदाधिकाऱ्यांमुळे रखडला तर गाळेधारक न्यायालयात गेल्यामुळेदेखील मनपाकडून वसुलीची प्रक्रिया थांबली होती. मात्र, वेगवेगळ्या न्यायालयाने निर्णय दिल्यापासून मनपाकडूनदेखील वसुलीसाठी किंवा कारवाईसाठी फारसे प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. मात्र, गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात सहा आयुक्तांपैकी तीन आयुक्तांनी वसुलीवर भर दिला. यामध्ये प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, उदय टेकाळे व सतीश कुलकर्णी यांच्या कार्यकाळातच गाळेधारकांकडून थकीत भाड्याची रक्कम वसुल झाली आहे, तर प्रभारी आयुक्त म्हणून रुबल अग्रवाल यांच्यासह जीवन सोनवणे व चंद्रकांत डांगे यांच्या कार्यकाळात मात्र वसुलीदेखील झाली नाही व कारवाईदेखील झाली नाही.
आयुक्तांच्या कार्यकाळात झालेली वसुली
१. किशोरराजे निंबाळकर -२२ कोटी
२. उदय टेकाळे - ८५ कोटी
३. सतीश कुलकर्णी - ५ कोटी
दंड व शास्तीच्या रकमेत मिळू शकतो दिलासा
मनपाकडून सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत गाळेधारकांवर थकीत भाड्यापोटी लावण्यात आलेला पाचपट दंडाची रक्कम व २ टक्के शास्ती अशी रक्कम टाळून वसुली केली जात आहे. जेणेकरून गाळेधारकांनादेखील थकीत रक्कम भरताना जास्त अडचण निर्माण होणार नाही. तसेच ५ पट दंडाबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात येऊ शकतो. त्यामुळेच मनपाने दंड व शास्तीची रक्कम वगळून वसुली मोहीम सुरू केली आहे.