लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा प्रशासनाने ८ जानेवारीपासून मालमत्ता कराची थकीत वसुली करण्यात यावी यासाठी अभय योजना राबविली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच ३१ जानेवारीपर्यंत थकीत मालमत्ता कराची रक्कम शास्तीसह भरल्यास ७५ टक्के सूट देण्यात येत आहे. आतापर्यंत शहरातील ४ हजार ४९१ नागरिकांनी ३ कोटी २६ लाख ५४ हजार रुपयांची रक्कम भरली आहे. दरम्यान, अभय योजनेंतर्गत शास्तीवर ७५ टक्के सूट ३१ जानेवारीपर्यंतच राहणार असून, ३० व ३१ रोजी शनिवार व रविवार असला तरी प्रभाग समिती कार्यालयात भरणा स्वीकारला जाणार असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली.
मनपा प्रशासनाकडून वसुलीची स्थिती वाढावी म्हणून ८ जानेवारीपासून ही योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार थकबाकीदारांनी ३१ जानेवारीपर्यंत मालमत्ता कराची थकबाकी भरल्यास त्यांना दंडाच्या रकमेत ७५ टक्के सूट मिळणार आहे. तर १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत भरणा केल्यास ५० टक्के सूट तर १५ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत थकबाकीचा भरणा केल्यास २५ टक्के सूट मिळणार आहे. मात्र, १ मार्च २०२१ पर्यंत कराच्या थकबाकीचा भरणा न केल्यास पहिल्यापासून दरमहा २ टक्के दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. अभय योजना सुरू झाल्यानंतर नागरिकांचा भरणा वाढला असून, या योजनेमुळे काही प्रमाणात का असेना, मनपाच्या तिजोरीत वाढ होत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत शास्तीच्या एकूण मागणी असलेल्या ३३ लाख ७३ हजारपैकी २२ लाख ३५ हजार रुपयांची शास्ती माफ करण्यात आली आहे. तसेच गुरुवारी व शुक्रवारी मनपाच्या तिजोरीत एकाच दिवसात प्रत्येकी ५० लाख रुपयांचा भरणा झाला असल्याचीही माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
एकूण झालेला भरणा
प्रभाग समिती १ - १ कोटी ८१ हजार ५१०
प्रभाग समिती २ - ६७ लाख ३६ हजार ९०३
प्रभाग समिती ३ - १ कोटी १ लाख ८३ हजार ३७६
प्रभाग समिती ४ - ५६ लाख ५२ हजार ३५७