अधिकाऱ्यांवर ठपका : कुपोषण प्रकरणात ७ दिवसात खुलासा मागविला
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आसराबारी येथील आकाश पावरा या बालकाच्या मृत्यूप्रकरणात आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत ७ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ७ दिवसात खुलासे मागविण्यात आले आहेत. अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
आसराबारी येथील बालकाच्या मृत्यूनंतर यंत्रणा जागी झाली होती. या ठिकाणी कुठल्याच उपाययोजना, कुठलीच यंत्रणा पोहोचली नव्हती हे समोर आल्यानंतर संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. यात आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम, आरोग्य तपासणी मोहीम, योजना पोहोचविणे या कामात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना तर मातांना माहिती न देणे, योजना न पोहोचविणे यात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्यसेवक यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.