लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यानंतर सुरू झालेल्या संघटनात्मक बदलांच्या वाऱ्याची दिशा काहीशी बदलली असून, आता एक-दोन नव्हे, तर जिल्ह्यासाठी १२ कार्याध्यक्ष निवडीचे नियोजन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आखले जात आहे. चोपड्याच्या बैठकीत हा विषय असल्यानेच या बैठकीतून दोन गट समोर आले आहेत.
अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी १२ कार्याध्यक्ष निवडीच्या निर्णयाला विरोध दर्शविला असून याचेच पडसाद चोपडा येथे आयोजित बैठकीवर पडले. काँग्रेसमध्ये शहराध्यक्षपद अडीच वर्षांपासून रिक्त आहे. शिवाय संघटना वाढविण्यासाठी यात बदल करण्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चाही झाल्या असून जिल्हाध्यक्ष पदासाठी नावेही मागविण्यात आली आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर होणाऱ्या हालचालींमुळे काँग्रेसमध्ये गट पडले आहेत.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी यांनी चोपडा येथे बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डी. जी. पाटील आदी उपस्थित होते. मात्र, निमंत्रण दिलेले माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांच्यासह जवळपास सर्वच प्रमुख पदाधिकारी या बैठकीला गैरहजर होते. यामागे १२ कार्याध्यक्ष निवडीच्या निर्णयाला विरोध असल्याचे सांगितले जात आहे.
असे आहे नियोजन...
जळगाव शहरासाठी ४ कार्याध्यक्ष, जळगाव लोकसभा मतदारसंघ व रावेर मतदारसंघ यांच्यासाठी प्रत्येकी स्वतंत्र चार कार्याध्यक्ष, असे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. आहेत ती पदे रिक्त ठेवून इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्याध्यक्ष निवड करून नेमकी संघटना वाढणार कशी, असा प्रश्न उपस्थित करून या निर्णयाला विरोध केला जात आहे. मात्र, वरिष्ठ या निर्णयावर ठाम असल्याची माहिती आहे.
शहराध्यक्ष निवड दूर, कार्याध्यक्षांची निवड?
जळगाव शहराध्यक्ष निवड न करता इच्छुकांना कार्याध्यक्ष पद देण्याची तयारी पदाधिकारी करीत असून जिल्हा कार्यकारिणीत केवळ तेवढेच बदल करण्याचे संकेत दिले जात आहेत. अशा स्थितीत काही वरिष्ठांकडूनही या निर्णयाला विरोध होत असून एक वरिष्ठ पदाधिकारी हे बैठकीला उपस्थित राहूनही शांतच बसून होते, अशी माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता अंतर्गत कलह वाढण्याची चिन्हे आहेत.