रेल्वे विभागातील ३८ कर्मचारी सेवानिवृत्त
जळगाव : भुसावळ रेल्वे विभागातील विविध स्टेशनवरून ३० जुलै रोजी ३८ रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनिमित्त रेल्वे प्रशासनातर्फे ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार कार्मिक अधिकारी दिलीप खरात यांनी मानले.
पथदिवे बंदमुळे नागरिकांची गैरसोय
जळगाव : रेल्वे स्टेशनकडून जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे स्टेशनकडे जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची रात्रीदेखील या रस्त्यावरून वर्दळ सुरू असते; परंतु अंधारामुळे या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, तरी मनपा प्रशासनाने पथदिवे बसविण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
शिवाजी नगरकडील तिकीट खिडकी अद्यापही बंदच
जळगाव : गेल्या महिन्यापासून बहुतांश रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू झाल्या असतानांही, रेल्वे प्रशासनातर्फे अद्याप शिवाजी नगरच्या बाजूने असलेली तिकीट खिडकी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवाजीनगरकडून येणाऱ्या प्रवाशांना तिकीट बुकींग करण्यासाठी मुख्य तिकीट खिडकीकडे यावे लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाल्यामुळे, ही तिकीट खिडकीही सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.