जि. प.ची वाट बिकट
जळगाव : जिल्हा परिषदेत जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर अगदी जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत असून कर्मचाऱ्यांमधून प्रचंड संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. शुक्रवारी अनेक दुचाकी या रस्त्यावरून घसरल्या. तातडीने याबाबत काही तरी निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
बदल्यांची चर्चा
जळगाव : जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तसेच विनंती बदल्यांना ९ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. जि. प.तील दोन विभागप्रमुख बदलीच्या रांगेत आहेत. त्यांना प्रत्येकी चार वर्षांचा काळ जळगाव जिल्हा परिषदेत झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्हा परिषदेत बदल्यांचाच विषय चर्चीला जात आहे.
कृषी सेवक नियुक्तीची मागणी
जळगाव : दहिगाव संत (ता. पाचोरा) येथे तालुका कृषी सेवक येत नसल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत असताना प्रशासकीय यंत्रणेकडे या ठिकाणी येऊन पाहण्यासही वेळ नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
महागडी बियाणे शेतात टाकून आधीच हवालदिल बनलेल्या शेतकऱ्यांना पिकावर नेमका कोणता रोग आला, याची माहिती मिळत नसल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी नियमित तालुका कृषी सेवक नेमून त्यांनी शेतकऱ्यांच्या या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.