अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा नवा पर्याय उभा केला असला तरी ग्रामीण भागात व जिल्हा परिषदेच्या शाळा व शिक्षकांना हा ऑनलाइनचा पर्याय राबविण्यास मोठी अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. अशात जि. प. च्या अनेक शाळा बंद असताना, जळगाव तालुक्यातील सावखेडा खुर्द येथील शिक्षकांनी गावात ‘ओट्यावर शाळा’ ह अभिनव उपक्रम राबवून शिक्षणाचा नवा पर्याय उभा केला आहे.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला मुख्याध्यापक अरुण चौधरी, प्रवीण चौधरी व किरण सपकाळे या शिक्षकांनी चांगल्याप्रकारे राबवून इतर शाळांसाठीदेखील नवा पर्याय उभा केला आहे.
काय आहे ओट्यावर शाळा उपक्रम?
१. सावखेडा खुर्द जि. प. शाळेत एकूण ३ शिक्षक आहेत. गाव लहानसे व येथील नागरिकांचा व्यवसाय मजुरी व शेती हाच आहे. तसेच शहरापासून गाव दूर असल्याने इंटरनेटची समस्यादेखील नेहमीच असते. अशा परिस्थितीत मोबाइलवर ऑनलाइन पध्दतीने शिक्षण देण्यास अनेक अडथळे येतात.
२. त्यामुळे गावातील जि. प. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी सकाळी १० वाजता आपापल्या घरातील ओट्यावर येऊन आपले दप्तर घेऊन बसतो. तिन्ही शिक्षक दररोज जळगावहूनच प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठीचा दररोजचा अभ्यासक्रमाची झेरॉक्स काढून काही प्रश्नावली घेऊन येतात.
३. नंतर तीच प्रश्नावली गावातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या ओट्यापर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांना दिली जाते. परत तासानंतर शिक्षक पुन्हा विद्यार्थ्यांकडे येतात. ओट्यावर बसून प्रत्येक विद्यार्थ्याला भेटून त्याने सोडविलेली उत्तरे तपासून त्याने केलेल्या चुकांचे निरसन करतात.
कोरोनापासूनही बचाव आणि शिक्षणही मिळते
या उपक्रमामुळे विद्यार्थी घरातच थांबून आपले शिक्षणदेखील पूर्ण करत आहेत. विशेष म्हणजे पालकदेखील घरीच थांबून शिक्षकांसोबत या उपक्रमात सहभागी होत पाल्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत.
गावातील तरुणवर्ग ही सरसावला
अनेक खासगी संस्था व इतर सरकारी शाळादेखील कोरोनाचे कारण देत वर्षभरापासून बंद असून, विद्यार्थ्यांचे शिक्षणदेखील थांबविले आहे. मात्र, सावखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी राबविलेल्या या उपक्रमाची चर्चा सावखेड्याच्या पंचक्रोशीत होत आहेत. जि. प. शाळेतील शिक्षक प्रयत्न करत असताना, सावखेडा गावातील इतर उच्चशिक्षित तरुणदेखील या उपक्रमात सहभागी झाले आहेत. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ही ‘ओट्यावरची शाळा’ दररोज भरत असते.
कोट..
गावात इंटरनेटची समस्या कायम आहे. प्रत्येक पालकाकडे मोबाइल असेलच असे नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण हे एका गावात राबविणे कठीण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांशी नाते कायम राहावे व प्रत्यक्ष संवादाने शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थीदेखील या शिक्षणाचा आनंद घेत आहेत.
-अरुण चौधरी, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, सावखेडा खु.