लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महावितरण कार्यालयात आंदोलन करीत अधिकाऱ्याला बांधून ठेवल्याप्रकरणी तसेच पोलीस अधिकाऱ्याला अरेरावी केल्याप्रकरणी महावितरण कार्यालयातच आमदार मंगेश चव्हाण यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असताना ते जिल्हाधिरी कार्यालय आले आणि तेथून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून भाजप नेत्यांनीही आक्रमक होत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
शेतक-यांचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या कारणावरून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह आंदोलकांनी वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता फारूक शेख यांना दोरीने बांधून ठेवले. हा गोंधळ सुरू असताना पोलीसही तेथे दाखल झाले. यावेळी डीवायएसपी कुमार चिंथा यांनाही आमदार चव्हाण यांनी अरेरावी केल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरून मंगेश चव्हाण यांना पोलीस ताब्यात देणार होते मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना भेटणार होते. यासाठी आमदार चव्हाण देखील जिल्हाधिकारी कार्यालयात आले. येथे नंतर पोलीसही दाखल झाले व त्यांनी आमदार चव्हाण यांना ताब्यात घेतले.
कायदेशीर कारवाई करणार
पोलिसांनी आमदार चव्हाण यांना ताब्यात घेतल्यानंतर खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे यांनी पोलिसांशी याविषयी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन असून लोकप्रतिनिधीला अशाप्रकारे ताब्यात घेणे योग्य नाही असा मुद्दा या भाजप नेत्यांनी मांडला. त्या वेळी कायदेशीर जी कारवाई आहे ती करावीच लागेल असे पोलिसांनी सांगितले. तसेच या प्रकरणी मारहाण केल्याचाही आरोप केला जात असून त्यासाठी फुटेज देखील तपासले जातील असे पोलिसांनी सांगितले.
सरकारकडून दडपशाहीचा प्रयत्न
शेतकरी आज संकटात असून त्याच्या हितासाठी आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना अशाप्रकारे अटक करणे म्हणजे सरकारकडून दडपशाही सुरू आहे, असा आरोप यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी केला. एकीकडे मुख्यमंत्री सांगतात शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडित करणार नाही व ऊर्जामंत्री सांगतात वीज बिलात सवलत दिली जाईल. यामुळे शेतकरी आशेवर असून सरकारकडूनच शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचेही खासदार पाटील म्हणाले. ३१ मार्च पर्यंत विज बिल भरायचे आहे तर तोपर्यंत वीज पुरवठा खंडित करू नका, सरकारच्या वेगवेगळ्या घोषणांमुळे गोंधळ निर्माण होत असून यामुळेच शेतकरी संकटात सापडत असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या आमदार मंगेश चव्हाण यांना जबरदस्तीने गाडीत बसविले गेल्याचाही आरोप भाजप नेत्यांनी केला. गोरे इंग्रज गेले आणि हे काळे इंग्रज रुपी सरकार शेतकरी, जनता व लोकप्रतिनिधींवर अन्याय करीत असून याचा आपण तीव्र निषेध करीत असल्याचेही खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू
लोकप्रतिनिधीला जबरदस्तीने ताब्यात घेतले जात असल्याने व शेतकऱ्यांनाही न्याय मिळत नसल्याने नाईलाजास्तव आम्हाला आंदोलन करावे लागेल असे आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी सांगितले. या सरकारने राज्याचे वाटोळे केले असून शेतकऱ्यांनाही ते न्याय देऊ शकत नसल्याने आंदोलने या पुढे सुरूच राहतील असेही यावेळी सांगण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांकडे आंदोलनाचा मुद्दा नाही
जिल्हाधिकारी राऊत यांच्याशी भाजप शिष्टमंडळ कोरोना विषयी चर्चा करीत असताना त्यात आमदार मंगेश चव्हाण देखील होते. मात्र या ठिकाणी महावितरण कार्यालयातील आंदोलनाविषयी मुद्दा उपस्थित झाला नाही.