उर्वरित शाळांची तयारी सुरू; ५८४१ शिक्षकांचे लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुक्त गावांमध्ये आज, गुरुवारपासून इयत्ता आठवी ते बारावीच्या वर्गांना प्रत्यक्षात (ऑफलाइन) सुरुवात होत आहे. कोरोनामुक्त गावांमधील एकूण ७०८ शाळांपैकी ३०६ शाळांनी तयारी दर्शविली असून, या शाळांची घंटा गुुरुवारी खणखणणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, ग्रामपंचायतींचा ठराव आणि पालकांच्या संमतीशिवाय शाळा सुरू करण्यात येऊ नये, अशा सूचना शासनाने केल्या होत्या. त्यानुसार शिक्षण विभागाने कोरोनामुक्त गावातील शाळांकडून ठराव मागविले होते. जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्त गावांमध्ये ८०७ शाळा आहेत. त्यापैकी ३०६ शाळांनी प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास तयारी दर्शविली आहे. त्या शाळांचे ठराव बुधवारी शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. दरम्यान, गुरुवारी शाळा उघडणार आहे. परिणामी, गेल्या दीड वर्षापासून ओसाड पडलेल्या शाळा गजबजलेल्या पाहायला मिळतील.
१ लाख ६८ हजार विद्यार्थी
जळगाव जिल्ह्यात इयत्ता आठवी ते बारावीत एकूण १ लाख ६८ हजार ६७० शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्यामुळे या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत होते. दरम्यान, आता या विद्यार्थ्यांना आज, गुरुवारपासून ऑफलाइन पद्धतीने शिक्षण मिळणार आहे. एका वर्गात दहा ते पंधरा विद्यार्थ्यांना बसविण्यात येणार आहे. तसेच कोरोना पार्श्वभूमीवर शाळांकडूनसुद्धा स्वच्छता करण्यात आली आहे.
२१०२ कर्मचाऱ्यांनी घेतली लस
शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी लसीचा डोस घ्यावा, अशा सूचनाही शासनाने केल्या होत्या. त्यानुसार एकूण ९ हजार ४५ शिक्षकापैंकी ५ हजार ८४१, तर एकूण २ हजार ६७० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी २ हजार १०२ कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे.