सिव्हीलमधील वॉर्ड विस्तारीकरण बारगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 01:06 PM2020-01-22T13:06:28+5:302020-01-22T13:06:47+5:30

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील महिला प्रसूतीपूर्व कक्षात उपलब्ध बेड संख्या व दाखल होणाऱ्या महिलांची संख्या बघता ...

 Civil extension ward bar removed | सिव्हीलमधील वॉर्ड विस्तारीकरण बारगळले

सिव्हीलमधील वॉर्ड विस्तारीकरण बारगळले

Next

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील महिला प्रसूतीपूर्व कक्षात उपलब्ध बेड संख्या व दाखल होणाऱ्या महिलांची संख्या बघता या वार्डाचे विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव रूग्णालय विभागातर्फे शासनाकडे गेल्या काही महिन्यांपूर्वी पाठविण्यात आला होता़ मात्र, अद्याप यावर कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीत़ त्यामुळे या कक्षातील गर्दी टाळण्यासाठी अद्याप प्रशासनाला तोडगा सापडलेला नाही़
शासकीय रूग्णालयात या वार्डात दररोज गर्दी असते त्या मानाने बेडची संख्या खूपच कमी असल्याने काही वेळेला एका बेडवर दोन तर काही वेळेला खालीच या महिलांना झोपविण्यात येते़ काही दिवसांपूर्वी एक महिला बराच वेळ ताटकळल्यानंतर बेड उपलब्ध नसल्याने अखेर खालीच चादर टाकून झोपल्याचा प्रकार समोर आला होता़ वर्षानुवर्षे असलेल्या या वार्डाची ही परिस्थिती सुधारणार कधी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात होता़
या वार्डातील हा प्रकार रोखण्यासाठी वार्ड विस्तारीकरण करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता, अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली होती़ मात्र, पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही यावर कुठलीही प्रक्रिया सुरू झालेली नाही़ दरारोज किमान ४५ ते ४६ महिला या कक्षात दाखल होत असतात या ठिकाणी उपलब्ध बेडची संख्या २९ आहे़
डॉक्टरांची चिडचिड...याकक्षात व कक्षाबाहेर महिला रूग्णांसह नातेवाईकांची प्रचंड गर्दी झालेली असते़ नवजात शिशू काळजी कक्षाबाहेर नातेवाईक बसलेले असतात़ अशा स्थितीत कुणी काही विचारणा केल्यास या कक्षातील डॉक्टर, परिचारिका यांची गर्दीमुळे प्रचंड चिडचिड होत असते़ मंगळवारी असेच चित्र पाहावयास मिळाले़ एका महिलेच्या नातेवाईकांना आगामी धोक्याबाबत डॉक्टर सतर्क करीत असताना थोडा गोंधळ उडून मोठी गर्दी झाली होती़ अशा वेळी संबधित डॉक्टरांची प्रचंड चिडचिड होऊन त्यांनी अन्य गर्दीला हुसकावून लावले़ थोड्या प्रमाणात आरडाओरड झाली होती़ त्यामुळे या कक्षात होणाºया गर्दीवर तोडगा काढणे व रिक्त पदे भरणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचा सूर उमटत आहे़

मोहाडी रूग्णालयाची प्रतिक्षाच
मोहाडी येथे शंभर बेडचे स्वतंत्र महिलांसाठी रूग्णालय होणार आहे़ या रूग्णालयाचे ६० ते ७० टक्के काम झाले असून काम पूर्ण होण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो़ अशी माहिती आहे़ गेल्या तीन वर्षांपूर्वी तत्कालीन आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी पाहणी करून आगामी तीन महिन्यात कामाला सुरूवात होण्याचा दावा केला होता़ तीन वर्षानंतरही अजूनही काम प्रलंबित आहे़ त्यामुळे या रूग्णालयाची प्रतिक्षाच असल्याच्याही प्रतिक्रिया उमटत आहेत़

वार्ड विस्तारीकरण होणार होतेच शिवाय मोहाडी येथील स्वतंत्र रूग्णालयाचे कामही जवळपास ७० टक्के झालेले आहे़ त्यामुळे ते पूर्ण झाल्यानंतर तेथे व्यवस्था होणार आहे़
- डॉ़ किरण पाटील, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय रूग्णालय

Web Title:  Civil extension ward bar removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.