जळगाव : राज्य परिवहन महामंडळातर्फे जळगाव शहरात २००७ मध्ये शहर बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला होता. तीन वर्ष ही सेवा चालली. मात्र, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे ही सेवा तीन वर्षानंतर बंद पडली. त्यानंतर २००९ मध्ये पुन्हा मनपाने एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत शहर बससेवेचा उपक्रम राबविला. या सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.
शहरातील पिंप्राळा, शिरसोली, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ते थेट शिरसोलीपर्यंत ही बससेवा होती. मात्र, या बसेसला शहरात कुठेही स्वतंत्रपणे बसस्थानक नव्हते. मनपाने मागणी करूनही राज्य परिवहन महामंडळातर्फे जुन्या बसस्थानकाची जागा या शहर बससेवेच्या स्थानकासाठी देण्यात आली नव्हती. त्यामुळे या बसेस शहरात जागोजागी मध्यवर्ती भागात थांबत होत्या. तरी देखील या बससेवेला चांगला प्रतिसाद होता. मात्र, या शहर बससेवेमुळे खासगी रिक्षांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्यामुळे अनेकदा वादाच्या घटना घडल्या होत्या. या मध्ये दगडफेकीत बसेसचे नुकसानदेखील झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे संबंधित मक्तेदाराने दीड वर्षांतच ही सेवा बंद केेल्याचे मनपा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
निवडणुकीतील आश्वासनांची अद्याप पूर्ती नाही
दोन वर्षांपूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांनी मनपात सत्ता आल्यानंतर शहर बससेवा सुरू करण्याचे अनेक सभांमध्ये आश्वासन दिले होते. मात्र, मनपात सत्ता स्थापन होऊन दोन वर्ष उलटल्यानंतरही अद्याप शहरात शहर बससेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे हे आश्वासन हवेतच विरल्याचे जळगावकरांमधून बोलले जात आहे.