चोपड्याचा देवदूत 'सागर' ठरतोय मदतगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 01:39 PM2020-04-27T13:39:21+5:302020-04-27T13:40:26+5:30

चोपडा येथील सागर बडगुजर हा दीन-दुबळ्यांसाठी मदतगार ठरत आहे.

 Chopra's angel 'Sagar' is helping | चोपड्याचा देवदूत 'सागर' ठरतोय मदतगार

चोपड्याचा देवदूत 'सागर' ठरतोय मदतगार

Next


धडपड-

कोणत्याही प्रकारातून मृत व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय अथवा हॉस्पिटलपर्यंत पोचविण्याचे काम असो अथवा अपघातात जखमी झालेले असो किंवा गरीब कुटुंबातील आजाराने जर्जर सदस्य असो केवळ माहिती मिळाली की तत्काळ देवरूपाने समोर उभा राहतो तो म्हणजे जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील सागर बडगुजर.
चोपडा शहरात नव्हे तर तालुक्यात खऱ्या अर्थाने सेवावृत्ती जोपासणाऱ्या सागर बडगुजर या व्यक्तीने माणुसकीचे दर्शन दाखवून येथील तापी सहकारी सूतगिरणीमध्ये सेवेत असलेल्या परराज्यातील अर्थात ओडिशातील मृत महिलेला उपचारासाठी दाखल करण्यापासून तर स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढेपर्यंत सर्वतोपरी मदत करून माणुसकीचे व देव रूपाचे दर्शन दाखविले. वास्तविकतेत रक्ताचे नाते असलेले लोकसुद्धा अंत्यविधी असेल, अपघात असेल, आत्महत्याग्रस्त व्यक्ती असेल, पाण्यात बुडालेला व्यक्ती असेल, विविध प्रकारचे विषारी अथवा बिनविषारी साप पकडणे असेल, अंत्ययत्रसाठी रामरथ उपलब्ध करणे असेल, अंबुलन्स सेवा द्यायची असेल, सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग असेल, हा संसर्ग होऊ नये म्हणून सॅनिटायझर स्टेशन सुरू करणे असेल अशा सर्वच कामांमध्ये शहरात रहिवास करीत असलेले आणि आख्ख आयुष्य समाजासाठी समर्पित करणारे सागर बडगुजर रुपाने या तरुणाकडे देवरूपाने पाहिले जाते.
हा तरुण गेल्या अनेक वर्षापासून ही सेवा जोपासत असल्याने दानशूर व सक्षम लोकांकडून मदत घेऊन सेवेसाठी तत्पर असतो.
तापी सहकारी सूतगिरणीमध्ये ओडिशा येथील ३५ वर्षीय कस्तुरा बुटिका ही महिला नोकरी करत होती. अचानक तिची तब्येत बिघडल्याने ती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आली होती. मात्र काहीही आजार नसल्याचे सांगून परत पाठवले. त्याच वेळेस त्या महिलेच्या अंगात प्रचंड ताप होता. यातच सूतगिरणीचे चेअरमन तथा माजी आमदार कैलास पाटील यांना या महिलेची तब्येत सूतगिरणी क्षेत्रातच बिघडल्याचे समजले. त्यांनी सामाजिक सेवा जोपासणारा व एम्बुलेन्स सेवा तत्काळ देणाऱ्या सागर या तरुणाला भ्रमणध्वनीवरून ही माहिती कळवली. कस्तुरा बुटिका या महिलेस सागरने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मृत्यू झाला. इकडे त्या महिलेचा भाऊबंदकी, समाज कोणीच नसल्याने अंतयात्रा कुठून काढायची हा प्रश्न तिच्या पतीच्या मनात निर्माण झाला. त्यावेळेस उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन खोलीपासून तिची अंत्ययात्रा काढावी असे ठरले. यासाठी सागरने दानशूर व्यक्तींशी संपर्क करून अंत्ययात्रेसाठी लागणाऱ्या साहित्याची अथवा ॲम्बुलन्ससाठी लागणारे डिझेलसाठी उपलब्धी केली. सध्या तर चोपडा शहरातील शहर पोलीस स्टेशन आवारात, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन आवारात आणि उपजिल्हा रुग्णालय आवारात या तरुणाने दानशूर लोकांकडून आर्थिक उपलब्धी करून कामानिमित्त येणाऱ्या लोकांसाठी त्यांना निर्जंतुक करण्यासाठी स्प्रे पंपद्वारा निर्जंतुक करण्यासाठी एक ठिकाणी जवळपास आठ ते दहा हजार रुपये खर्च केला आहे. हा पैसा जरी स्वतः सागर देत नसेल पण इतर लोकांकडून पैसे उपलब्ध करून सार्वजनिक कार्यालयात सेवा पुरविणे हे काही कमी नाही. कारण आजच्या काळात सहजासहजी कोणीही पैसे देत नसते. आपण दिलेला पैसा खरंच सत्कारणी लागतो आहे किंवा नाही हे तपासूनच पैसे देत असतो. मात्र हे सागरला सहज सोपे झाले आहे. सर्वच प्रकारची उपलब्धी कार्यांत सागर पारंगत झाला आहे.
एवढेच नव्हे तर सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून देश, राज्य, जिल्हास्तरीय सीमा बंदिस्त असल्याने अनेक गरीब लोकांना दोन वेळचे अन्नही मिळेनासे झाले आहे. अशातच सागरने शहरातील दानशूर व्यक्तींकडे संपर्क साधून गरीब लोकांना जेवण कसे देता येईल यासाठी झटपटत असताना अनेक लोक रस्त्याच्या बाजूला भुकेने व्याकुळ होऊन प्रतीक्षेत बसलेले पाहून सागर त्यांच्यापर्यंत अन्न पोहचवित आहे. कोरोनामुळे मी वाचतो की जिवंत राहतो असा विचार ठेऊन जिवंतपणी भुकेल्या पोटासाठी अन्न उपलब्ध करून देणे हे अधिक चांगले समजून स्वतःला झोकून घेतले आहे. त्यासाठी राजेश्वर प्लॅस्टिक किराणा चालकाकडून जीवनावश्यक अशा ३१ वस्तूंची १०० पाकिटे बनवून, त्यामध्ये तेल, साखर, तांदूळ, हळद, चटणी, मीठ यासारख्या वस्तू टाकून थेट कानाकोपऱ्यात ज्यांना जेवण मिळत नव्हते अशापर्यंत पोहोचवण्याचे काम या तरुणाने झपाटून केले आहे. झपाटलेल्या या तरुणाच्या सामाजिक सेवेला तोड नाही. कोणताही स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता या तरुणाची ही सेवा अशीच सुरू राहो यासाठी अनेक जाणकार शुभेच्छारुपी आर्थिक, धान्य, डाळी उपलब्ध करून देत आहेत.
लेखन-
-संजय सोनवणे, चोपडा, जि. जळगाव

Web Title:  Chopra's angel 'Sagar' is helping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.