लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत असताना लहान मुलांच्या आरोग्याचे प्रश्न वाढले आहेत. त्यातच आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लहान मुलांची ओपीडी दुपटीने वाढली असून यात न्यूमोनियाचे रुग्ण अधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यातही काही मुलांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत असून ते गंभीरावस्थेत दाखल होत असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले होते. शिवाय यात अनेक बालके गंभीरही झाली होती. त्यातच आता वातावरणातील बदल व विविध कारणांमुळे लहान मुलांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. खासगी व शासकीय दोनही यंत्रणेत लहान मुलांच्या ओपीडीत वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात लहान मुलांची पालकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे.
लहान मुलांची कोरोना चाचणी
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात न्यूमोनिया असलेल्या लहान मुलांची संख्या वाढली आहे. यातील काही मुलांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत असून या सर्व मुलांची कोरोना चाचणी केली जात आहे.
- १२ ते १३ लहान मुलांना ऑक्सिजन पुरवठा करावा लागत आहे. यात एक वर्षाखालील बालकांची संख्या अधिक आहे.
- नवजात शिशू काळजी कक्षात एक वर्षाखालील ४० पेक्षा अधिक बालकांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी सुविधांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांचा विश्वास वाढल्याने आता या ठिकाणी उपचारासाठी नागरिक स्वत:हून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
डेंग्यू, टायफॉइडचेही रुग्ण
लहान मुलांना न्यूमोनियासह विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. सद्य:स्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल लहान मुलांमध्ये डेंग्यू तसेच मलेरिया व टायफाॅइडच्या रुग्णांचाही समावेश आहे. त्या त्या पातळ्यांवर त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मात्र, ही संख्या या महिन्यात अधिक वाढली आहे.