जळगाव : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. शुक्रवारी दुपारी चांदवड येथून जळगावला येतील. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नगर नामकरण व फलक अनावरण कार्यक्रम होईल. शनिवारी सकाळी अजिंठा विश्रामगृहात अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक सकाळी ९ वाजता होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सकाळी १० वाजता शहर व जिल्हा बैठक, सकाळी ११.३० वाजता ओबीसी बहुजन हक्क परिषदेत ते सहभागी होणार आहेत.
२८ पासून ऑनलाईन रोजगार मेळावा
जळगाव : पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी ३५० रिक्त पदे भरण्याबाबत कळवले आहे. या मेळाव्याचा इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा तसेच संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य व रोजगार विभागाचे सहायक आयुक्त वि. जा. मुकणे यांनी केले आहे.
ऑक्सिजन प्लांट हाताळणीचे मिळणार प्रशिक्षण
जळगाव : कोविड महामारीमुळे ऑक्सिजन प्लांट क्षेत्रात मनुष्यबळाची गरज भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण ३० जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी रविवारपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त वि.जा. मुकणे यांनी केले आहे.