जळगाव - तालुक्यातील आव्हाणे येथील सन २०१५-२०२० या कालावधीत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत माजी सरपंच वत्सला मोरे यांच्याविरोधात पंचायत समितीने तालुका पोलीस स्टेशनमध्ये वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल केला होता. याविरोधात माजी सरपंचांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, जिल्हा न्यायालयाने हा अटकपूर्व फेटाळून लावला आहे.
सेवानिवृत्तांचा महापौरांकडून सत्कार
जळगाव -महानगरपालिकेतील अजून १५ कर्मचारी बुधवारी सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने महापौर दालनात या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, मुख्य लेखाधिकारी कपिल पवार यांच्या हस्ते रोपट्यासह कुंडी, शाल व रुमाल देऊन सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये सुनील धुमाळ, भिकन पेंढारकर, योगेश पाटील, विजय देशमुख, दिलीप पाटील, दिनकर पाटील यांचा समावेश होता. यावेळी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, चेतन सनकत व कुंदन काळे आदी उपस्थित होते.
निर्बंध शिथिल होताच पर्यटकांची गर्दी
जळगाव - जिल्ह्यातील यावल अभयारण्यात पर्यटनासाठी ८ जून रोजी बंदी उठविण्यात आल्यानंतर याठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. तसेच सातपुड्यात गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला असून, निसर्गदेखील बहरला आहे. यामुळे अनेर डॅमपासून ते चिंचपाणी, मनूदेवी, निंबादेवी, वाघझिरा व पाल याठिकाणी आता पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
पीकविमा योजनेसाठी १५ जुलैपर्यंत मुदत
जळगाव- केंद्र शासनाने खरीप हंगाम-२०२१ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कंपनी निश्चित केली असून, ही योजना जळगाव जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
---