चाळीसगाव : चाळीसगाव-नांदगाव रस्ता चांगला झाल्यामुळे या रस्त्यावर वेगाला नियंत्रण आणण्यासाठी कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे.त्याचाच एक भाग म्हणून या सुसाट रस्त्यावरून भरघाव वेगाने चालणाऱ्या कारने दुचाकी वाहनाला जोरदारपणे धडक दिल्याने दोन दिवसांपूर्वी चार जणांचा बळी गेला होता. या घटनेत घटनास्थळी रोहिणी,लक्ष्मीवाडी व तळेगाव येथील ग्रामस्थांनी जखमींना उचलण्यापासून ते थेट दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यापर्यंत मदतकार्य करून माणुसकीचे दर्शन घडविले.
चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथील भगवान नगराज पाटील यांच्या शेतात तांदुळवाडी ता.कन्नड येथील विलास वसंत ठाकरे हे कुटुंबासह राहत होते. ते या परिसरात शेतमजुरी करीत असत. ठाकरे यांच्या गर्भवती पत्नीला बाळंतपणासाठी आपल्या गावी सोडवण्यासाठी भगवान पाटील यांच्या मोटारसायकलने तांदुळवाडीकडे जात असताना भरधाव कारने धडक दिल्याने चार जणांचा बळी गेला होता.
चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील रोहिणी गावाजवळ सकाळपासून या रस्त्यावर छोटा हत्ती या वाहनाचे टायर फुटल्यामुळे रस्त्यात उभा होता. या वाहनांच्या काही अंतरावर कार व मोटारसायकलची समोरासमोर जोरदारपणे धडक झाली.
वाहनांचा अमर्याद वेग
या अपघाताची माहिती देताना येथील काही जण सांगतात, अतिशय भयंकर असे अपघाताचे दृश्य होते. कारच्या अमर्याद वेगामुळे मोटारसायकलवरील चार जण दूरवर फेकले गेले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर दुसऱ्या दिवशी या घटनेच्या काही अंतरावर सायंकाळी पाच वाजता समोरासमोर मोटारसायकलची धडक झाली. त्यात दोघेजण जखमी झाले आहेत.
नेहमीच मदतीसाठी धावाधाव
या भागात नेहमी अपघात होत असतात. अपघाताची ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी हॉटेलचे मालक भिका दराडे व त्यांचा मुलगा,संजय घुगे, संजय सानप,संजय गिरे, लक्ष्मीवाडीतील आबा पाटील,नितीन दराडे तसेच तळेगाव येथील ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य केले. या गावकऱ्यांनी सर्वप्रथम जवळच असलेल्या तळेगाव येथील आरोग्य केंद्राचे वाहन बोलविले नंतर चाळीसगावशी संपर्क साधून वाहनाची मागणी केली. तळेगावच्या वाहनातून गर्भवती महिला व एक जणांना तर चाळीसगावच्या वाहनातून अन्य जणांना उपचारासाठी पाठविले. तांदुळवाडी येथे या घटनेने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाला धुळे येथे घेऊन जाण्यास १०८ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार यांनी वेळ न दवडता लगेच खासगी रुग्णवाहिका स्व खर्चाने करून जखमी मुलाला धुळे येथे हलविले.
----
नियोजन गरजेचे
या भागातील रस्ता अतिशय चांगला झाला आहे, त्यामुळे नेहमी वाहने बेफान वेगाने येत-जात असतात. एखादे वाहन किंवा व्यक्ती आल्यास ती मेलीच म्हणून समजा. अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या गतीवर नियंत्रण गरजेचे आहे.