जळगाव : शहरातील सर्व मॉल्स व मल्टिप्लेक्समध्ये शासकीय तारखेनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्याविषयी शिवसेना जळगाव महानगर व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे शहरातील सर्व मॉल्स व मल्टिप्लेक्सच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे. महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या मार्गदर्शनात सदर निवेदन देण्यात आले. मॉल्स, मल्टिप्लेक्समध्ये नाताळ हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो.
युवा पिढीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार होण्यासाठी सर्व मॉल्स व मल्टिप्लेक्समध्ये शिवजयंती उत्सव थाटात साजरा करण्यात यावा, अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी विराज कावडिया, सचिव अमित जगताप, उपाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, प्रशांत सुरळकर, ईश्वर राजपूत, जाकीर पठाण, गणेश गायकवाड, पीयूष हसवाल, प्रीतम शिंदे, उमाकांत जाधव, अर्जुन भारुळे, उमेश चौधरी, पूनम राजपूत, शंतनू नारखेडे उपस्थित होते.
बहूभाषिक ब्राह्मण संघातर्फे हळदी-कुंकू
जळगाव : येथील बहुभाषिक ब्राह्मण महिला संघातर्फे मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी गुरुवारी दुपारी ४ वाजता विसनजीनगरातील गायत्री मंदिरात हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बालरोगतज्ज्ञ व आहार समुपदेशक डॉ. प्रीती जोशी यांचे ‘स्त्रियांचे आरोग्य व आहार’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्षा सुधा खटोड, अमला पाठक, उपाध्यक्षा स्वप्नगंधा जोशी, वृंदा भालेराव, स्वाती कुलकर्णी यांनी केले आहे.
जुन्या नगरपालिकेची जागा हॉकर्सला द्या
जळगाव : फुले मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सवर मनपाकडून कारवाई केली जात असून, हॉकर्सच्या पोटापाण्याचा विषय गंभीर होत जात आहे. मनपाने हॉकर्सला व्यवसाय करण्यासाठी साने गुरुजी रुग्णालयाच्या जागेऐवजी जुन्या नगरपालिकेची जागा देण्यात यावी, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विष्णू घोडेस्वार यांनी केली आहे. याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे, तसेच ही जागा हॉकर्सला देण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मनपाला आदेश दिले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
फुपनगरीतील शेतकरी घेणार जिल्हाधिकाऱ्यांची भेट
जळगाव : तालुक्यातील फुपनगरी येथील गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूउपसा सुरू आहे, तसेच या वाळूमाफियांकडून फुपनगरी भागातच वाळूचे साठे केले जात आहे, तसेच या गावातील शेतकऱ्यांना वाळूमाफियांकडून दमदाटीसुद्धा केली जात असल्याने, या वाळूमाफियांचा बंदोबस्त करण्याचा मागणीसाठी फुपनगरी येथील शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती फुपनगरी येथील शेतकरी स्वप्नील जाधव यांनी दिली.
रात्री थंडी, तर दिवसा उकाडा
जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून, चार दिवसांपासून जळगाव शहराचा किमान पारा १० ते १२ अंशावर स्थिर आहे. एकीकडे रात्रीच्या तापमानात घट होत असली तरी दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे जळगावकरांना रात्री थंडी, तर दिवसा उकाडा, अशा दुहेरी हंगामाचा प्रत्यय येत आहे. कमाल तापमान ३४ अंशापर्यंत पोहोचले आहे. बुधवारी शहराचे किमान तापमान १० अंशापर्यंत खाली आले होते. दरम्यान, अजून काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
भाजप हॉकर्सची कार्यकारिणी जाहीर
(फोटो आहे..प्रभाकर तायडे)
जळगाव : भाजप हॉकर्स आघाडी जिल्हा महानगरची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर तायडे यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सरचिटणीसपदी संजय सोनवणे, किशोर नेवे, उपाध्यक्षपदी राजेंद्र चौधरी, सुनील जाधव, विजय पिंगळे, चिटणीसपदी रुखियाबी कुरेशिया, मंगला महाजन, किरण चौधरी, दिनेश वाणी, किशोर मोरे, कोषाध्यक्षपदी सुलोचना नवले, प्रसिद्धीप्रमुखपदी रवींद्र महाजन, नथ्थू तायडे, तर कार्यालयमंत्री म्हणून अरुण भोई, दिलीप पाटील यांची निवड करण्यात आली आहे.