भुसावल शहर हादसो का शहर है, यहा रोज, रोज हर मोड, मोड पे होता है, कोई ना कोई हादसा... असं म्हटल्यास वावगे ठरू नये. शहरात कधी निर्घृण खून तर कधी प्राणघातक हल्ले, घरफोडी, चोरी, लुटमार आदी घटना आता नित्याच्याच झाल्याचे दिसून येत आहे. रेल्वे इंजिनवर चालक अर्थात लोकोपायलट हे कर्तव्य करून घरी जात असताना गाईडलाईनजवळ अज्ञात चौघांनी त्यांना अडवून मारहाण करीत त्यांच्याकडील सोन्याची चेन, मोबाईलसह १३०० रुपयांची रोकड व कागदपत्रे हिसकावली होती. ही घटना २० रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रेल्वे इंजिन चालक चंदन अनिरुद्ध प्रसाद (२८, रा. संभाजीनगर) हे २० रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कर्तव्यावरून घराकडे येत असताना गाईडलाईन रोडवर पाण्याच्या टाकीजवळ अज्ञात चार जणांनी रस्ता अडविला. तसेच त्यांच्या तोंडावर व शरीरावर फायटरने मारहाण करीत दुखापत करत त्यांच्या गळ्यात घातलेली तब्बल दीड तोळे वजनाची चेन, मोबाईल, कागदपत्रे असा जवळपास ५३ हजार ५०० रुपयांचा ऐवज हिसकावून फरार झाले. याप्रकरणी चंदन प्रसाद यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चौघांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सहाय्यक निरीक्षक हरीश बॉय, नाईक योगेश महाजन करीत आहेत.