तालिबान क्रिकेट क्लबवर आली बंदी
जयपूर : राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एका क्रिकेट संघाचे नाव हे तालिबान क्लब सी असे ठेवण्यात आले होते. या संघावर आता बंदी घालण्यात आली आहे. आयोजकांनी म्हटले की, या संघाच्या नावासोबत तालिबान हा शब्द चुकीने टाकण्यात आला होता. या संघाचे नाव आता स्पर्धेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यांचा पहिला सामना झाला. त्यानंतर या संघावर बंदी घालण्यात आली.
मार्क बाऊचरने मागितली माफी
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी माफी मागितली आहे. बाऊचर यांनी संघातील एका खेळाडूला त्याच्या वर्णावरून संबोधले होते. त्यामुळे आता त्यांनी माफी मागितली आहे. ते म्हणाले की, मी माफी मागतो. मी हे कोणत्याही उद्देशाने केले नव्हते; पण माझ्याकडून जे घडले ते चुकीचे आहे. जे घडले ते माझ्यामुळेच’ बाऊचरने फिरकीपटू पॉल ॲडम्स याने बाऊचरवर वर्णभेदी टिप्पणी केल्याचा आरोप केला होता.
महिला फुटबॉलपटू आकर्षक नाहीत - समीया सुलुहू
नवी दिल्ली : टांझानियाच्या नवनिर्वाचित आणि पहिल्या महिला अध्यक्ष समीया सुलूहू यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, महिला फुटबॉलपटू या लग्नासाठी आकर्षक नसतात. त्या महिला आहेत पुरुष नाहीत.’ टाझांनियातील डार ए सलाम शहरात २३ वर्षाआतील पुरुषांच्या संघासमोर त्यांनी हे वक्तव्य केले.
मेरी कोमने घेतली चाहतीची भेट
नवी दिल्ली : सहा वेळची विश्वविजेती मेरी कोम हिने तिच्या एका चाहतीची भेट घेतली आहे. मेरी हिचा टोकियोत पराभव झाल्यानंतर या चाहतीला अश्रू आवरले नव्हते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यानंतर मेरीने त्या चाहतीचा शोध घेतला आणि तिची भेट घेतल्याची माहिती सोशल मीडियात दिली.
हेडिंग्ले हे रुटचे घरचे मैदान - पानेसर
लंडन : भारताचा खेळ हा अप्रतिम असला तरी इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांच्यासाठी हेडिंग्ले हे त्याचे घरचे मैदान आहे. त्यामुळे भारतीयांना या खेळाडूंना येथे सामोरे जाताना मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो, असे मत इंग्लंडचा माजी खेळाडू मॉंटी पानेसर याने व्यक्त केले आहे. तरीही भारताने जर प्रथम गोलंदाजी केली तर त्यांच्याकडे विजयाच्या अधिक संधी आहेत, असेही पानेसरने म्हटले.
‘माझ्या आईने म्हटले होते शतक पूर्ण करशील’
नवी दिल्ली : पाकिस्तानचा फलंदाज फवाद आलम याने वेस्ट इंडिजविरोधात शतक पूर्ण केले आहे. त्याने म्हटले की, माझ्या आईने म्हटले होते की, या सामन्यात तू शतक पूर्ण करशील’. फवादचे या आधीचे शतक हे फेब्रुवारी २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात होते. हे त्याचे चौथे शतक होते. आता त्याने ११ महिन्यांनी संघात पुनरागमन करताना पाचवे कसोटी शतक झळकावले आहे.