हिंगोणा, ता.यावल, जि.जळगाव : पाणीपुरवठा समान होण्यासाठी मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.गावात गेल्या १० वर्षांपासून पाणीटंचाई उद्भवत असल्याने तब्बल १५ ते २० दिवसांनी पाणीपुरवठा होत होता. याला कंटाळून ग्रामस्थांनी व हिंगोणेकर मित्रमंडळ, पुणे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्राम पंचायत कार्यकारी मंडळाला वारंवार निवेदने दिली. त्यात गावातील पाणीटंचाई निवारण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना व कार्यकारी मंडळाने पाण्यासाठी आजपर्यंत काय उपायोजना केल्या, असे प्रश्न उपस्थित केले होेते. गावातील महिलांनीदेखील यावल येथे पंचायत समितीत व ग्रामपंचायत कार्यालयावर हंडामोर्चा नेऊन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधत मुख्य जलवाहिनीवरून घेतलेले नळ कनेक्शन बंद करण्यात यावे, अशी मागणी वेळोवेळी केली होती.त्या अनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांनी १२ मार्च रोजी ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्याचे निवारण करण्याबाबत, तसेच गावातील मुख्य जलवाहिनीवरील घेतलेले नळ कनेक्शन तत्काळ बंद करावे, अशी नोटीस दिली होती. त्यावर सरपंच सत्यभामा भालेराव यांनी तत्काळ दखल घेत आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, तसेच सरपंचांनी मुख्य जलवाहिनीवरील घेतलेले अवैध नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम हाती घेतली. आतापर्यंत १० अवैध नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे थोडा फार का होईना, पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सरपंचांनी घेतलेल्या निर्णयाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे.तसेच मोर धरणापासून जलस्वराज प्रकल्पाची मुख्य जलवाहिनी गावात आली असून, या जलवाहिनीवरसुद्धा व्हॉल्व्ह बसविण्यात यावा. जेणेकरून या जलवाहिनेचे पाणी सरळ गावात न जात जलकुंभात पडेल व जलकुंभ चांगल्याप्रकारे भरेल, अशी मागणीसुद्धा गावातील महिला व ग्रामस्थ करीत आहे.
मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 15:08 IST
पाणीपुरवठा समान होण्यासाठी मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम हिंगोणा ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम
ठळक मुद्देयावल तालुक्यात हिंगोणा येथील उपक्रमसर्वांना समान पाणी मिळण्यास होणार मदतपाणीटंचाईला कंटाळून ग्रामस्थ व हिंगोणेकर मित्र मंडळाने शासन व प्रशासनाकडे केला होता पाठपुरावाविद्यमान सरपंचांनी विषय धरला उचलूनग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास