ई-पीक पाहणीला शेतकरी कंटाळले :
(डमी ११७८)
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शेतात नुकसान झाल्यानंतर मोबाइल ॲपवर नोंदणी आणि ७२ तासात कंपनीला कळवण्याच्या त्रासदायक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली असून आता यासाठी सहा पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे एक प्रकारे विमा कंपनीच्या मनमानीला यामुळे ब्रेक लागणार असून, ऑफलाइन पध्दतीनेदेखील शेतकरी आता आपल्या शेतात झालेल्या नुकसानीची माहिती कृषी विभागाकडे देऊ शकतात. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
बहुतांश शेतकऱ्यांनी ॲपद्वारे सातबारा उतारावर पीक पेराची ऑनलाइन नोंद घेण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. ई-पीक पाहणी ॲप वेळोवेळी रिस्टार्ट रेंज जाणे परत येणे फोटो अपलोड न होणे आदी अडचणी निर्माण होत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात वैतागले आहेत. त्यातच बहुतेक शेतकरी वर्गाकडे अँड्रॉइड मोबाइल नसल्याने त्यांना आपल्या पिकांची नोंद शासनाच्या आदेशाप्रमाणे सातबाऱ्यावर करण्यासाठी अँड्रॉइड मोबाइल धारकांची विनवणी करावी लागत असून अँड्रॉइड मोबाइलधारकसुद्धा ॲप चांगल्या क्षमतेने व प्रत्येक गावातील नेटवर्क सपोर्ट करत नसल्याने नोंदणी करून देण्यास सुद्धा त्या शेतकऱ्याला सहकार्य करीत नाही. आता नुकसानीचे प्रस्ताव पाठविण्यासाठी सहा पर्याय उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
आधी काय होते पर्याय
१. विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर ७२ तासात पिकांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर द्यावी लागत होती.
२. टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता आली नाही तर शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्याकडे तक्रार करण्याचा पर्याय होता.
हे आहेत नवीन सहा पर्याय
१. शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती ७२ तासात टोल फ्री क्रमांकावर करता येईल.
२. ई-मेलवरसुध्दा नुकसानीची माहिती देता येईल.
३. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन नुकसानीची माहिती देता येईल.
४. तालुकास्तरावर देखील विमा कंपनीचे कर्मचारी कार्यरत असून त्यांना माहिती देता येईल.
५. नुकसानीबाबतचा अर्ज करूनसुध्दा शेतकऱ्यांना माहिती देता येणार आहे.
६. शेतकऱ्यांना आता हे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाल्याने नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल.
अतिवृष्टीने ८ हजार हेक्टरवर नुकसान
जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे साडे ८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान हे कापसाचे झाले असून, अजूनही कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नुकसानीच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
कोट..
ज्या भागात नुकसान झाले आहे त्या भागातील शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती विमा कंपनीला द्यायला टोल फ्री क्रमांकाचादेखील वापर करता येईल. शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. मात्र, आता दिलेल्या सहा पर्यायांमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
- संभाजी ठाकूर, कृषी अधीक्षक