लोकमत न्यूज नेटवर्क
बोदवड : गेल्या २४ तासांपेक्षा जास्त काळ उलटूनही तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच असून, या रिपरिपीने शहरातील वीजपुरवठा बुधवारी रात्री १ वाजेपासून खंडित झाला आहे. तो गुरुवारी सायंकाळपर्यंतही सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बँकिंग व्यवस्था, त्याचप्रमाणे मोबाइल यंत्रणेचे टॉवर, पीठगिरणी आदी सर्व बंद झाले होते.
शहरातील वीजपुरवठा खंडित झालेल्या, केबल तुटलेली ठिकाणे तसेच वीज उपकरणे, खराब झालेली ठिकाणे शोधण्यास वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना रात्रीपासून दमछाक करावी लागत आहे.
संध्याकाळी स्टेशन रोड परिसर त्याचप्रमाणे आनंदनगर, भुसावळ रस्ता परिसराचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता.
रात्रीपासून वीजपुरवठ्यातील दोष शोधत आहोत. अनेक ठिकाणी दोष आहेत. ते शोधण्यात अडचणी येत आहेत. दोष शोधून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.
-पी.एन. झोपे, सहाय्यक अभियंता, वीज वितरण कंपनी, बोदवड