प्रसाद धर्माधिकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद: गावाच्या विकासासाठी शासनाने दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी शासकीय अडचणीमुळे नशिराबाद ग्रामपंचायतच्या तिजोरीत पडून आहे. त्यामुळे विविध योजनांपासून ग्रामस्थ वंचित राहत आहे. निधीचा वापर झाला नाही. त्यातच ग्रामपंचायत संपुष्टात आली, त्यामुळे कोटी रुपये परत जाणार आहेत.
नशिराबाद नगरपंचायतीची घोषणा झाल्यानंतर येथे प्रशासकीय राजवट सुरू होती. दरम्यान ग्रामपंचायतीच्या मध्ये सन २०२०-२१ च्या १५व्या वित्त आयोगात सुमारे ९२ लाख रुपयांचा निधी, दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सुमारे ४२ लाख रुपयांचा निधी व १४ व्या वित्त आयोगातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी संरक्षण भिंती बांधकामासाठी सुमारे दहा लाख रुपये निधी पडून आहे. त्यातच डीपीडीसी व एमआरजीएसमधून सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्या निधीची रक्कम परत जाऊ नये या करता प्रयत्न केले जात आहे. निधी खर्च करण्याचे अधिकारच नसल्याने योजनेचा निधी पडून आहे. दरम्यान शासनाच्या पीएफएमएस व एफएमएस ही कार्यप्रणाली कार्यरत नाही. त्यामुळे योजनेचा सदरील रक्कम विकास कामांकरिता खर्च करता आली नाही असे लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत अधिकारीवर्ग सांगत आहे. गावातील विविध मूलभूत समस्यांवर उपाय काढीत कामाचे वर्कऑर्डर झाली. कामाची सुरुवात झाली मात्र त्यातच प्रशासकीय राजवट ग्रामपंचायत व नगरपंचायत या गोंधळात निधीची रक्कम पडून राहिली. ग्रामपंचायतला सदर निधी खर्च करता येतो मात्र त्यात निधी खर्च करण्यासाठीची शासनाची कार्यप्रणाली कार्यान्वित झाली नाही. त्यासाठीच्या गाईडलाईन मिळाली नाही. त्यामुळे निधी वितरीत कसा करायचा असा पेच निर्माण झाला.
ईन्फो
शासकीय अडचणींमुळे योजनेचा निधी खर्च झालेला नाही तो निधी परत जाणार नाही यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे. गावाच्या विकासासाठी सदरील निधी खर्च करण्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत असून त्यावर तोडगा निघावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. गावातील सर्व लोकप्रतिनिधी वरिष्ठांची भेट घेणार आहोत
-लालचंद पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष
शासनाच्या अडचणीमुळे योजनेचा निधी खर्च झाला नाही. प्रशासकीय कारभार सुरू होता, त्यातच ग्रामपंचायत संपुष्टात येऊन नगरपरिषदेची कार्यवाही सुरू झाली. त्यामुळे योजनेची रक्कम पडून आहे. गावातील सर्व लोकप्रतिनिधी मिळून पालकमंत्र्यांकडे कैफियत मांडणार आहोत व त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.
विकास पाटील, माजी सरपंच, नशिराबाद