घरकूल निकालाचा युतीला मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 07:02 PM2019-09-01T19:02:51+5:302019-09-01T19:03:17+5:30

सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर, चंद्रकांत सोनवणे यांच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवर टांगती तलवार, महापालिकेतील राजकीय समीकरणांवर परिणाम शक्य; भगत बालाणी, कैलास सोनवणे यांचे पद धोक्यात

Bigger blow to coalition alliance | घरकूल निकालाचा युतीला मोठा फटका

घरकूल निकालाचा युतीला मोठा फटका

Next

मिलिंद कुलकर्णी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगाव पालिकेतील घरकूल योजनेतील गैरव्यवहाराच्या खटल्याचा निकाल लागला. अनपेक्षित आणि धक्कादायक असाच हा निकाल आहे. १९९९ मध्ये सुरु झालेल्या घरकूल योजनेची इतिश्री २० वर्षांनंतर अशा पध्दतीने होईल, असे कोणालाच वाटले नव्हते. पुन्हा आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर आणि चंद्रकांत सोनवणे या तिघांना हा मोठा धक्का आहे. त्यांची उमेदवारी आता ‘जर-तर’च्या फेºयात अडकली आहे. जैन आणि सोनवणे सेनेचे तर देवकर हे राष्टÑवादी काँग्रेसचे नेते आहेत.
जळगाव घरकूल योजना ही पालिकेने १९९९ मध्ये राबवली. २००६ मध्ये या योजनेतील गैरव्यवहाराच्या आरोपावरुन गुन्हा दाखल झाला. २०१२ मध्ये दोषारोपपत्र दाखल होऊन काही आरोपींना अटक झाली. आणि आता २०१९ मध्ये सर्व ४८ आरोपींना तुरुंगवास आणि दंड झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील एका योजनेचा हा २० वर्षांचा प्रवास आहे.
४८ आरोपींपैकी ६ नगरसेवकांचे दरम्यानच्या काळात निधन झाले. तपासाधिकारी नितीन नेहुल, विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सुर्यवंशी यांचेही निधन झाले. ११ तपासी अधिकारी, पाच न्यायाधीश आणि ४८ साक्षीदारांची तपासणी, मूळ आणि पुरवणी दोषारोपपत्र असे सर्वसाधारण या खटल्याचे स्वरुप होते.
४८ आरोपींपैकी दोन कंत्राटदार, एक मुख्याधिकारी आणि उर्वरित सगळे हे नगरसेवक होते. त्यापैकी काहींनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहेत.
२० वर्षांत पालिकेचे राजकारणदेखील आमुलाग्र बदलले. किमान ३० तत्कालीन नगरसेवक आताच्या स्थितीत पालिका राजकारणाच्या वर्तुळाबाहेर आहेत. त्यांच्या राजकीय भवितव्यावर या निकालाचा काही परिणाम संभवत नाही. परंतु, सुरेशदादा जैन यांची साथ सोडून भाजपमध्ये वर्षभरापूर्वी सामील झालेल्या नगरसेवकांचे राजकीय भवितव्य मात्र पणाला लागले आहे.
महापालिकेत भाजपचे गटनेते असलेले भगत बालाणी, माजी नगराध्यक्षा लता भोईटे, माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, दत्तू कोळी आणि स्विकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांना तुरुंगवास झालेला आहे.
माजी नगराध्यक्षद्वय पांडुरंग आणि सुधा काळे यांना शिक्षा झाली असून त्यांचे पूत्र अमित आणि पुतणसून दीपमाला हे महापालिकेत भाजपचे नगरसेवक आहेत.
भाजपचे सभागृहनेते ललित कोल्हे यांचे वडील विजय कोल्हे यांना शिक्षा झाली असून त्यांच्या मातोश्री सिंधू कोल्हे या माफीच्या साक्षीदार असल्याने त्यांच्यावर स्वतंत्र खटला चालणार आहे.
शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक व माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या पत्नी अलका लढ्ढा यांनाही शिक्षा झाली आहे.
महापालिकेतील मातब्बर नगरसेवकांची चिंता वाढविणारा हा निकाल आहे. जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव, अपात्रता टाळण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन अशी धावपळ त्यांना भविष्यात करावी लागणार आहे. यासोबतच घरकूल योजनेचे हे परिणाम पाहता व्यापारी संकुलातील गाळेधारकांविषयी न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करीत काही ठरावाचा प्रयत्न झाला तरी त्याला भाजप नगरसेवक आता समर्थन देतील, अशी शाश्वती राहिलेली नाही.
वर्षभरापूर्वी जळगाव महापालिकेत ५७ जागा जिंकून भाजपची पूर्ण बहुमताने प्रथम सत्ता आली. ही सत्ता आणायला कारणीभूत ठरलेले नगरसेवक व त्यांचे नातलग यांना निकालामुळे राजकीय नुकसान संभवते. सीमा भोळे यांची महापौरपदाची कारकिर्द संपल्यानंतर भारती सोनवणे यांचे नाव चर्चेत आहे, मात्र आता कैलास सोनवणे यांना शिक्षा झाली आहे. विजय कोल्हे आणि सिंधू कोल्हे यांची नावे आरोपींमध्ये असल्याने ललित कोल्हे यांची डोकेदुखी वाढली आहे.

Web Title: Bigger blow to coalition alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.