जळगाव : भरारी फाउंडेशनने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना आणि कुटुंबाना शिलाई मशीन, शेळ्या तसेच खतांचे वाटप केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गुरुवारी हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी उपस्थित होते.
जळगाव येथे भरारी फाउंडेशन ही संस्था जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, यासाठी जिल्ह्यात शेतकरी संवेदना अभियान राबवित आहे. या अभियानाच्या माध्यमातूनच त्यांनी आनंदा मंजा अहिरे, रा. विटनेर, ता. पारोळा यांना शेतीला जोडधंदा म्हणून आज कृषिदिनी सहा शेळ्या दिल्या. त्याचबरोबर जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील राहुल निकम याला खते, बी-बियाणे व कीटकनाशके देण्यात आले. तर कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष गमावल्याने निराधार महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने कविता अनिल मराठे, शिरसोली व सुरेखा अनिल चव्हाण, जळगांव यांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. त्यासोबतच भरारी फाउंडेशनने ११४ गावातील ३० हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले आहे. या अभियानासाठी सचिन महाजन, विनोद ढगे, जयदीप पाटील, डॉ. स्वप्नील पाटील, सुदर्शन पाटील, रितेश लिमडा, दीपक विधाते व नीलेश जैन हे परिश्रम घेत आहे.
यावेळी रजनीकांत कोठारी,रवींद्र लढ्ढा, मुकेश हसवाणी, अमर कुकरेजा, संध्या सूर्यवंशी, रोटरी क्लबच्या अध्यक्षा अपर्णा भट, अनिल कांकरिया,अनिकेत पाटील, किशोर ढाके, सपन झूनझूनवाला, योगेश पाटील, नीलेश झोपे उपस्थित होते.