पाचोरा आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळाच्या परिस्थितीमुळे तब्बल दीड वर्षापासून भडगाव ते वाडे तसेच जळगाव ते वाडे बससेवा काही वर्षांपासून अचानक बंद करण्यात आल्या आहेत. सध्या पाचोरा आगारातून सर्वत्र बसफेऱ्या सुरू झालेल्या दिसत आहेत. मात्र भडगाव ते वाडे बसफेऱ्या सुरू न झाल्याने प्रवाशांना भडगाव येथे शासकीय कार्यालयांमध्ये कामांकरिता, बाजारपेठ, संजय गांधी, वृद्धापकाळ योजनेचे अनुदान, पगार घेण्यासाठी गोरगरिबांसह वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. आता काही शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थी, विद्यार्थिनींनाही प्रवास करणे अवघड बनले आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या बस सेवेच्या लाभापासून वाडे, टेकवाडे बुद्रुक, नावरे, बांबरुड प्र. ब., गोंडगाव, सावदे, घुसर्डी, दलवाडे, लोणपिराचे, बोरनार, कनाशी, देव्हारी, बोदर्डे, निंभोरा, कोठली, नवे वडधे, जुने वडधे, भडगाव आदी १८ गावांतील प्रवाशांना, विद्यार्थ्यांना प्रवास करणे त्रासाचे ठरत आहे. तरी भडगाव ते वाडे तसेच जळगाव ते वाडे बंद बसफेऱ्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.