लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तंत्र शिक्षण संचालनालयाने दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार प्रवेशप्रक्रियेला बुधवार, ३० जूनपासून सुरुवात झाली आहे.
दहावी निकालाची वाट न पाहता पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया प्रारंभ झाली आहे. हा अभ्यासक्रम राबवणाऱ्या सर्व महाविद्यालयांत पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करण्याबबत सविस्तर वेळापत्रक तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना यंदा कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 'ई-स्क्रूटिनी'चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्याद्वारे ऑनलाइन अर्जाची पडताळणी होऊन अर्ज निश्चित केला जाईल. शिवाय, ज्या विद्यार्थ्याकडे संगणक किंवा मोबाइल फोन नाही ते जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन ऑनलाइन नोंदणी करून प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज निश्चित करतील. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी येतील, अशा विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
तर यादीत दिसणार नाही नाव
दरम्यान, सर्व प्रवेशप्रक्रियेदरम्यान प्रत्यक्ष स्क्रूटिनी पद्धत निवडणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्व निर्बंधांचे पालन करत सुविधा केंद्रांवर सुरक्षित अंतर पाळायचे आहे. शिवाय सुविधा केंद्रांवर एकाच वेळी गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे, अशा सूचना तंत्रशिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या उमेदवाराने ऑनलाइन भरलेल्या अर्जाची ई-स्क्रूटिनी किंवा प्रत्यक्ष स्क्रूटिनी केली नाही तर अशा उमेदवारांची नावे प्रवेशप्रक्रियेसाठी तयार करण्यात येणाऱ्या कॅप आणि नॉन कॅप राउंडच्या यादीमध्ये दिसणार नाहीत.
अर्ज भरल्याची निश्चिती करणे आवश्यक
कॅप जागांतर्गत प्रवेशासाठी इच्छुक सर्व प्रकाराच्या विद्यार्थ्यांनी ई-स्क्रुटिनी पद्धत किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी पद्धतीद्वारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी व अर्ज भरल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे. अशा पात्र नोंदणीकृत उमेदवारांना कॅप गुणवत्तेसाठी आणि कॅपद्वारे प्रवेशासाठी विचारात घेतले जाईल. त्याच्याबरोबर संस्थास्तरावरील कोट्यामध्ये व कॅपनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवारांनी ई-स्क्रुटिनी पद्धत किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी पद्धतीद्वारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी व अर्ज भरल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संस्थांमध्ये स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे. या उमेदवारांची गुणवत्तायादी संस्थापातळीवर संस्थेद्वारे तयार केली जाईल.
असे आहे प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक
- पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ३० जून ते २३ जुलै दरम्यान वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करायची आहे, सोबतच अर्जाच्या छाननीची पद्धत निवडून आवश्यक कागदपत्रांच्या कॉपी वेबसाइटवर अपलोड करायच्या आहेत.
- ३० जून ते २३ जुलै दरम्यान विद्यार्थी ई-स्क्रूटिनीद्वारे किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनीद्वारे ऑनलाइन अर्ज आणि अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करुन अर्ज निश्चित करतील. तसेच पडताळणीत त्रुटी आढळली तर विद्यार्थ्याच्या लॉगइनमध्ये अर्ज परत पाठवून त्रुटीचे तपशील विद्यार्थ्यांना कळवून ते दुरुस्तीसाठी सूचित केले जाईल.
- २६ जुलै रोजी तात्पुरत्या पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेशासाठीची गुणवत्ता यादी जाहीर करायची आहे.
- २७ ते २९ जुलै दरम्यान तात्पुरती यादी जाहीर झाल्यानंतर त्यात काही तक्रार असल्यास त्या सादर करणे.
- ३१ जुलै रोजी पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.