जळगाव : शहरातील आर.आर. विद्यालयासमोर सोमवारी दुपारी १२.३० वाजता अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक निखळल्याने अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, रस्त्यांचा मधोमध अपघात झाल्याने या रस्त्यावर पूर्णपणे वाळू सांडली गेल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. तसेच ट्रॅक्टर चालकाने ट्रॉली सोडून या ठिकाणाहून पळ काढला.
सद्यस्थितीस जिल्ह्यातील एकाही वाळू गटाचा लिलाव झालेला नाही. मात्र, तरीही गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. सोमवारी आर.आर. विद्यालय परिसरात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. या रस्त्यावर आधीच असलेल्या खड्ड्यांमुळे हे चाक घाले. अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॉली सोडून ट्रॅक्टर घेऊन पळ काढला. दरम्यान, हे ट्रॅक्टर कोणाचा, याबाबत कोणताही तपास लागलेला नाही. वाहतूक पोलिसांनी ही ट्रॉली जमा केली आहे.
०००००००००
ट्रॅक्टर ट्रॉलीसह नाल्यात कोसळले
आव्हाणे, खेडी भागातून अवैध वाळू उपसा सुरूच असून सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह कानळदा-ममुराबाद रस्त्यावरील लेंडी नाल्यात कोसळले. परंतु, चालकाने प्रसंगावधान राखून तत्काळ उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
ममुराबाद-कानळदा रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू होत असते. सोमवारी सकाळी असेच एक ट्रॅक्टर कानळदा-ममुराबाद रस्त्यावरून वाळू वाहतूक करीत होते. ७.३० वाजताच्या सुमारास त्या रस्त्यावरील लेंडी नाला पुलावरून जात असताना अचानक ट्रॅक्टर ट्रॉलीसह नाल्यात कोसळला. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखत, त्याने तत्काळ उडी मारली. त्यामुळे त्याचा जीव वाचला. पण, दुसरीकडे ट्रॅक्टर आणि ट्रॉली अक्षरश: नाल्यात पडून बुडाले. हा प्रकार स्थानिक नागरिकांना कळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने आधी ट्रॉली, नंतर ट्रॅक्टर नाल्यातून बाहेर काढण्यात आले. यावेळी घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झालेली होती.