भुसावळ : महिलांसह किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा मासिक पाळी व्यवस्थापन हा विषय नाजूक असला तरी यासंदर्भात शहरासह ग्रामीण भागात जनजागृती व्हावी आणि स्त्रियांची मानसिकता बदलून कापडमुक्त चळवळ उभी राहावी. त्यासाठी स्त्रियांसह पुरुषांनीही या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्य करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत मासिक पाळी व्यवस्थापन ऑनलाईन कार्यशाळेत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि पंचायत समिती पाचोरा व जामनेर यांच्यातर्फे आयोजित मासिक पाळी व्यवस्थापन ऑनलाईन कार्यशाळा डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
डायटच्या वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. मंजूषा क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या जनजागृती कार्यशाळेच्या प्रास्ताविकात त्या म्हणाल्या की, मासिक पाळी व्यवस्थापनासंदर्भात वेगळेपण वैविध्य आणि विषयाला जास्तीत जास्त सखोल व व्यापक बनवण्यासाठी हा विषय केवळ चर्चेचे पुरता मर्यादित न राहता ती एक चळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पहिल्या सत्रात कापडमुक्त गाव चळवळ व निधी फाउंडेशनच्या वैशाली विसपुते यांनी फाउंडेशनच्या कामाविषयी माहिती देऊन ग्रामीण भागात आलेले अनुभव आणि त्या कामातून बदललेली स्त्रियांची मानसिकता आणि त्यातून उभी राहिलेली कापडमुक्त गाव चळवळ याविषयी जिव्हाळ्याने व आत्मीयतेने अनुभव कथन केले. स्वतःच्या मुलीचा म्हणजे निधीचा जन्म झाल्यानंतर लगेचच झालेल्या मृत्यूने आलेले नैराश्य व त्या नैराश्यातून काम करण्याची ऊर्मी निर्माण झाली आणि समाजासाठी निधी फाउंडेशन उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या सत्रात सावखेडा शाळेचे संजय रामदास पद्मे यांनी स्वतःच्या शाळेत मासिक पाळी व्यवस्थापनासंदर्भात रुजवलेले विचार आणि उपक्रम यावर सादरीकरण केले. माता पालकांच्या हळदीकुंकू कार्यक्रमात ते सॅनिटरी पॅडचे वाटप करतात.
पाचोरा गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी महिला व किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य साक्षरता प्राप्त करून देण्यासाठी प्रशासन नेहमी कार्यतत्पर व कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली.
अध्यक्षीय मनोगतात डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी कार्यशाळेचे कौतुक करून स्त्री-पुरुष जन्माची कहाणी जेथून सुरू होते. त्या नाजूक विषयाकडे लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे हे या कार्यशाळेतून जनजागृती होत असल्याचे ते म्हणाले.
कार्यशाळेचे आयोजन व नियोजन मासिक पाळी व्यवस्थापन पाचोरा तालुका समन्वयक तथा वरखेडी केंद्रातील जि.प. राजुरी बुद्रूक शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा उदावंत यांनी केले. माताभगिनी व किशोरवयीन मुलींसाठी ही जनजागृती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑनलाईन कार्यशाळेसाठी तांत्रिक साहाय्य बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन परधाडे शाळेच्या ज्योती महाजन-देशमुख यांनी तर आभार जामनेर गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी विषय साधन व्यक्ती महेंद्र नाईक, मंगला जवळकर, वनिता जीकाटे, गायत्री पाटील, श्यामल सुषालादे, सीमा पाटील, बी. पी. ठाकूर, सुरेखा तायडे, संगीता सूर्यवंशी, जयश्री मुसळे, सुखदा पाटील, उज्ज्वला देशमुख, पुष्पलता पाटील, माया शेळके, मंगल म्हेत्रे, दीपाली पंडित, कविता चौधरी, रंजना कोळी, उज्ज्वला श्रीकृष्ण सोनार आदींनी परिश्रम घेतले.
पाचोरा व जामनेर तालुक्यासह जिल्हा व राज्यभरातील जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक व शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी ऑनलाईन कार्यशाळेचा लाभ घेतला.
310821\31jal_7_31082021_12.jpg
ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी मान्यवर.