भुसावळ : येथील सक्षम नारी फाउंडेशनतर्फे जागतिक स्तनपान दिनानिमित्त पालिका रुग्णालयात प्रसूती झालेल्या मातांना सुकामेवावाटप करण्यात आले. तसेच स्तनपानाचे महत्त्वही सांगण्यात आले.
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जागतिक स्तनपान आठवडा म्हणून जगभरात साजरा केला जातो. स्तनपानाचे महत्त्व ह्या वेळेस अधोरेखित केले जाते. स्तनपान करून माता केवळ बाळाची तहान व भूकच शमवत नाही, तर ती बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून बाळाचे आरोग्यही सुरक्षित करते. स्तनपान केल्याने माता आपला अतिरिक्त रक्तस्राव तसेच वाढणारे वजन नियंत्रित ठेवते. स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण कमी आढळते. स्तनपान करून माता आपल्या बाळामध्ये एक दृढ प्रेमाचे बंधन प्रस्थापित करते. पण, स्तनपान करण्यासाठी मातेचा आहारही पौष्टिक हवा. अन्यथा, बाळाची वाढ व्यवस्थित होणार नाही. म्हणून सक्षम नारी फाउंडेशनतर्फे पालिका रुग्णालयात प्रसूती झालेल्या मातांना काजू, बदाम, सुकामेव्याचे स्वतःच्या हातांनी बनवलेल्या पौष्टिक लाडूंचे वाटप करण्यात आले.
पालिका रुग्णालयात लाडूंचे वाटप डॉ. कीर्ती फलटणकर, डॉ. सुवर्णा गाडेकर, वंदना हंस, संगीता जगताप, पल्लवी अंबाडे, सुनंदा डांगे, संघमित्रा आणि शीतल मोरे यांनी केले.