लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव/ नशिराबाद : चिखली ते तरसोद या दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर नशिराबादच्या पुढे टोल नाका सुरू करण्यात आला. मात्र, या टोल वसुलीला नागरिकांनी विरोध केला आहे. कामे अपूर्ण असताना टोल नाका कसा? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला. तसेच न्यायालयात धाव घेण्याचा इशारादेखील देण्यात आला. नागरिकांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील टोल नाक्याला विरोध केला आहे.
चिखली ते तरसोद असे चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. हे काम जलदगतीने व निकषानुसार करण्यात येत आहे. मात्र, तरसोद ते फागणेदरम्यानचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, महामार्गावर अनेक बाबींच्या त्रुटी कायम आहेत. त्या आधी दूर कराव्यात, अशी मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. तसेच त्याचे निवेदन देण्यात आले आहे.
तरसोद ते चिखली दरम्यानचे काम पूर्ण होण्यास आणखी दोन ते तीन महिने लागू शकतात. या मार्गावर काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. ही कामे पूर्ण न करता टोल सुरू झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारादेखील पंकज महाजन यांनी दिला.
पहिल्या दिवशी वाद
टोलनाका सुरू झाल्यानंतर काही नागरिकांनी त्याला विरोध केला. बहुतेकांना येथे टोलनाका बुधवारपासून सुरू झाल्याचे माहीत नव्हते. त्यामुळे वाद वाढले. या रस्त्यावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यातच अनेक वाहनधारकांकडे फास्टटॅग नसल्याने त्यांना दुप्पट दंड लागत होता. काहींनी मासिक पास मिळावा यासाठी देखील गर्दी केली होती. या टोल नाक्यावर २५० रुपये मासिक पास लागू करण्यात आला आहे.
स्थानिकांना नोकरी द्या
या टोलनाक्यावर स्थानिकांना नोकरी मिळावी यासाठी अनेक जण आग्रही आहेत. या टोलनाक्यावर बुधवारी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नोकरी मिळावी यासाठी पोहोचले होते. त्यामुळे आणखीच गोंधळ उडत होता. एक ते दोन दिवसांत या सर्व बाबींचा निपटारा केला जाईल, अशी माहिती टोल नाका संचालन करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक शहाबल खान यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव ते भुसावळ या दरम्यान रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तरी सद्यस्थितीत टोल नाका सुरू करू नये. प्रवासी वाहतूक अद्याप सुरळीत झालेली नाही. त्यामुळे जनतेला भुर्दंड नको, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी केली आहे. रवींद्र पाटील यांनी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिले आहे.