जळगाव : घरफोडीचे तब्बल २८ गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेला अट्टल गुन्हेगार पवन उर्फ भुऱ्या रामदास आर्य (३४, रा. इंदूर, मध्य प्रदेश) याला एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी जालना येथून अटक केली.
अयोध्या नगरातील कल्पेश संतोष पाटील यांच्या बंद घरातून फेब्रुवारी २०२० मध्ये भुऱ्या याने ५७ हजार ५०० रुपयांचे दागिने लांबवले होते. तेव्हापासून तो फरार होता. या गुन्ह्याचे तपासी अंमलदार विजय नेरकर यांना भुऱ्या याची माहिती मिळाली होती. मध्य प्रदेश व महाराष्ट्रात त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो जालनाच्या कारागृहात असल्याचे समजल्यानंतर पथकाने भुऱ्या याला जालना येथून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याला न्या. डी.बी.साठे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला ३० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तो महाराष्ट्र व मध्य प्रदेश पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्याच्याविरुद्ध बीड, बुलढाणा, जळगाव, इंदूर, भोपाल, धुळे यासह इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहे.