लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपातील सत्ताधारी भाजपमधील गटबाजी सर्वश्रुत असताना आता मनपातील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेतील गटबाजीही उघड होवू लागली आहे. मंगळवारी वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक संपल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक व नितीन बरडे यांच्यात कृषी उत्पन्न बाजार समितीला वृक्ष तोडल्याप्रकरणी मनपाने लावलेल्या दंडावरून चांगलाच वाद झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही नगरसेवकांनी वाद झाला नसल्याचे सांगितले आहे.
मंगळवारी मनपात वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीला वृक्ष तोडप्रकरणी दीड वर्षांपुर्वी ११ लाखांचा दंड ठोठावला होता. मात्र, दीड वर्षात ही रक्कम न भरल्याने मनपाने दंडाच्या रक्कमेवर व्याज सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही बाजार समितीने दंड भरलेला नाही. याबाबतचा विषय वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात येणार होता. मात्र, आयुक्त सतीश कुलकर्णी हे बैठकीला नसल्याने हा विषय चर्चेत आला नाही. मात्र, प्रशांत नाईक यांनी बाजार समितीकडून दंड वसुल करण्याचा सूचना मनपाला दिल्या. त्यावर सेनेचेच नगरसेवक नितीन बरडे यांनी आक्षेप घेत. बाजार समितीतील वृक्ष लहान रोपटे असल्याचे सांगत दंड माफ करण्याचा सूचना दिल्या. याच विषयावरून दोन्ही नगरसेवकांमध्ये शाब्दीक चकमक झाली. बैठकीनंतरही दोन्ही नगरसेवकांमध्ये वाद सुरुच होता अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
कोट..
बैठकीत कोणताही वाद झाला नाही. बाजार समितीला दंड झाला आहे तो महापालिका वसुल करणारच आहे. अशा परिस्थितीत बरडे यांच्याशी वाद होण्याचा कोणताही विषय नाही.
-प्रशांत नाईक, नगरसेवक, शिवसेना
वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत किंवा बैठकीनंतरही कोणताही वाद नाईक यांच्याशी झालेला नाही. शिवसेनेचे १५ नगरसेवक एकत्र आहेत. भाजपाप्रमाणे आम्ही एकमेकांशी भांडत नाहीत. भाजपच्याच काही लोकांनी ही अफवा पसरविली असेल.
-नितीन बरडे, नगरसेवक, शिवसेना