लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एक डॉक्टर नियुक्त असतानाही ते जिल्हा परिषदेच्या बाह्य रुग्ण विभागात येत नसल्याने हा विभाग बंद करावा, असा ठराव आरोग्य समितीच्या बैठकीत करण्यात आला. या ओपीडीत केवळ एक महिला कर्मचारीच उपस्थित राहत असल्याचा मुद्दा सदस्यांनी सभेत मांडल्यानंतर हा ठराव करण्यात आला.
आरोग्य समितीची सभापती रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक झाली. कोरेाना काळात आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी असताना जिल्हा परिषदेच्या ओपीडीत न्हावी येथील डॉ. अभिषेक ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. यासह एक फार्मासीस्ट आणि एक तंत्रज्ञ अशी तिघांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नसतात, अशा परिस्थितीत ही ओपीडी बंद करावी, हा मुद्दा सदस्य अमित देशमुख यांनी मांडला. यासह कोरोनाबाबतच्या उपाययोजनाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
शेंदुर्णीला अतिरक्त डॉक्टर
शेंदुर्णीच्या आरेाग्य केंद्रामध्ये आस्थापना दोन डॉक्टरांची असताना या ठिकाणी पदोन्नतीने तीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. अनेक केंद्रांमध्ये डॉक्टर नसताना या ठिकाणी अतिरिक्त नियुक्ती कसा असा मुद्दाही देशमुख यांनी उपस्थित केला.
सरपंच कक्ष ते ओपीडी
तत्कालीन आरोग्य अधिकारी बी. कमलापूरकर यांनी जिल्हा परिषदेत बाह्यरूग्णविभाग ही संकल्पना मांडली होती. सदस्य नानाभाऊ महाजन यांनी पाठपुरावा करून सभेत हा ठराव मंजूर केला होता. मात्र, अचानक माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी सरपंच परिषदेच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अचानक ही ओपीडी बंद करून या ठिकाणी सरपंच कक्षाचे एका दिवसात उद्घाटन् केले होते. हा मुद्दा त्यावेळी गाजला होता. त्यानंतर पुन्हा या कक्षात सरपंच येत नसल्याने ओपीडी सुरू झाली मात्र, अचानक आता ती बंद करण्याचा ठराव करण्यात आला आहे.